अतिरिक्त वेळेत सेव्हिलावर २-० असा विजय; अ‍ॅल्बा, नेयमार यांचा प्रत्येकी एक गोल

जॉर्डी अ‍ॅल्बा आणि नेयमार यांनी अतिरिक्त वेळेत केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर बार्सिलोना क्लबने कोपा डेल रे फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम सामन्यात सेव्हिलाचा २-० असा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने ३० मिनिटांचा अतिरिक्त खेळ खेळविण्यात आला. त्यात बार्सिलोनाने बाजी मारून सर्वाधिक २८ वेळा कोपा डेल रे चषकावर नाव कोरले.

गेल्या आठवडय़ात युरोपा लीग फुटबॉल स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या सेव्हिलाने ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेतील विजेत्या बार्सिलोनाला कडवी झुंज दिली. सामन्याच्या ३६व्या मिनिटाला गतविजेत्या बार्सिलोनाला जबर धक्का बसला. झेव्हियर मस्केरानोला सेव्हिलाच्या केव्हिन गॅमेरोला पाडल्यामुळे लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवण्यात आले. या निर्णयामुळे बार्सिलोनाला उर्वरित सामन्यात दहा खेळाडूंनीच खेळ करावा लागला. तरीही ९० मिनिटांपर्यंत बार्सिलोनाने सेव्हिलाला गोल करण्यापासून वंचित ठेवले होते.

दरम्याऩ, भरपाई वेळेत बार्सिलोनावरील दडपण काही अंशी कमी झाले. नेयमारला चुकीच्या पद्धतीने पाडल्यामुळे सेव्हिलाच्या डेव्हिड बॅनेगाला लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांनाही दहाच खेळाडूंनिशी उर्वरित लढतीत संघर्ष करावा लागला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्यामुळे ३० मिनिटांचा अतिरिक्त खेळ खेळवण्यात आला. त्यात सातव्याच मिनिटाला लिओनेल मेस्सीच्या अप्रतिम पासवर अ‍ॅल्बाने गोल करून बार्सिलोनाचे खाते उघडले. या गोलमुळे प्रेरित झालेल्या बार्सिलोनाने मग सामन्यावर वर्चस्व गाजवले. १२०व्या मिनिटाला नेयमारने त्यात भर टाकून बार्सिलोनाचा २-० असा विजय पक्का केला.

०४

बार्सिलोना क्लबने २०१५-१६ या हंगामात युरोपियन सुपर चषक, क्लब विश्वचषक, ला लिगा आणि कोपा डेल रे अशा एकूण चार स्पर्धाचे अजिंक्यपद पटकावले आहे.

२८

कोपा डे रे फुटबॉल स्पध्रेचे सर्वाधिक २८ विजेतेपद बार्सिलोनाच्या नावावर आहेत. त्यापाठोपाठ अ‍ॅथलेटिक बिलबाओ (२३) आणि रिअल माद्रिद (१९) यांचा क्रमांक येतो.

०१

गतविजेत्या बार्सिलोनाने १९९७-९८ सालानंतर पहिल्यांदा सलग दोन हंगामात जेतेपद पटकावले आहे. गतवर्षी त्यांनी अ‍ॅथलेटिको बिलबाओवर ३-१ असा विजय मिळवला होता.

सुआरेझला दुखापत; कोपा अमेरिका स्पध्रेला मुकणार

बार्सिलोनाचा आक्रमणपटू लुईस सुआरेझला कोपा डेल रे स्पध्रेच्या अंतिम लढतीत स्नायू दुखावल्यामुळे अध्र्यावरच मैदानाबाहेर जावे लागले. त्याच्या या दुखापतीमुळे पुढील महिन्यात होणाऱ्या कोपा अमेरिका स्पध्रेला तो मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘त्याला स्नायूला दुखापत झाली असावी. डॉक्टरांनी तपासल्यानंतरच दुखापतीचे स्वरूप समजू शकेल,’ असे मत बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी व्यक्त केले.

‘उद्या होणाऱ्या चाचणीपर्यंत वाट पाहावी लागेल,’ असे सुआरेझने ट्विट केले आहे. तो म्हणाला, ‘आशा आहे दुखापत गंभीर नसावी आणि पुढील आठवडय़ात राष्ट्रीय संघासोबत खेळेन. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी सर्वाचे आभार.’ २०१४व्या विश्वचषक स्पध्रेत इटलीच्या जॉर्जिओ चिएलीनीचा चावा घेतल्याप्रकरणी उरुग्वेच्या सुआरेझवर बंदी घालण्यात आली होती आणि मार्चमध्ये ती संपुष्टात आली. कोपा अमेरिका स्पध्रेत उरुग्वेचा पहिला सामना मेक्सिकोशी होणार असून त्यानंतर व्हेनेझुएला आणि जमैका यांचे आव्हान उरुग्वेला पेलावे लागेल.