स्पर्धेच्या २४व्या जेतेपदाची कमाई; लुइस सुआरेझची दिमाखदार हॅट्ट्रिक; गोल्डन बूट पुरस्काराचा मानकरी

लुइस सुआरेझच्या अफलातून हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या बार्सिलोनाने प्रतिष्ठेच्या ला लिगा स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. सुआरेझने साकारलेल्या हंगामातील तिसऱ्या हॅट्ट्रिकच्या बळावर बार्सिलोनाने ग्रॅनडावर ३-० असा विजय मिळवला. बार्सिलोनाचे ला लिगा स्पर्धेचे हे २४वे जेतेपद आहे. या विजयासह बार्सिलोनाने ९१ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. डिर्पोटिव्हो ला कारुनाला नमवणाऱ्या रिअल माद्रिदचे ९० गुण झाले आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सुआरेझने २२व्या मिनिटाला जॉर्डी अल्बाच्या पासवर पहिला गोल केला. ३८व्या मिनिटाला त्याने डॅनी अल्वेसच्या क्रॉसवर गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. ८६व्या मिनिटाला नेयमारच्या पासवर शानदार गोल करत सुआरेझने बार्सिलोनाच्या संस्मरणीय जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

ला लिगा जेतेपदासाठी बार्सिलोना विरुद्ध रिअल माद्रिद तर वैयक्तिक पातळीवर लिओनेल मेस्सी विरुद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डो असा मुकाबला होता. बार्सिलोनाला जेतेपद मिळवून देताना वलयांकित मेस्सी, रोनाल्डो, नेयमार यांना बाजूला सारत सुआरेझने बाजी मारली. गेल्या दोन वर्षांत सुआरेझच्याच सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या जोरावर बार्सिलोनाने सहा जेतेपदांची कमाई केली आहे. ९० गोलसह ला लिगा स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक गोल करण्याचा मानही सुआरेझनेच पटकावला. २००९ नंतर पहिल्यांदाच गोल्डन बूट पुरस्कारावरची मेस्सी आणि रोनाल्डोची हुकूमत सुआरेझने मोडून काढली आहे.

बलून डी’ओर पुरस्कारा वेळी मेस्सी, रोनाल्डो यांच्यासह नेयमार शर्यतीत होता. मात्र चांगल्या कामगिरीनंतरही सुआरेझचा इतिहास त्याच्यासाठी अडचण ठरत होता. प्रतिस्पर्धी खेळाडूला चावल्याप्रकरणी बंदीची शिक्षा पूर्ण केल्यानंतर नव्या दृष्टिकोनासह खेळणाऱ्या सुआरेझने बार्सिलोनाच्या संघाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. गेल्या पाच सामन्यांत सुआरेझने १४ गोल केले आहेत. विविध स्पर्धामध्ये ५२ सामन्यांत सुआरेझने ५९ गोल केले आहेत.

गोल करण्याच्या क्षमतेसह खेळण्याची शैली आणि वर्तन यासाठीच आम्ही सुआरेझला ताफ्यात दाखल करून घेतले होते. आताच्या घडीला त्याच्यासारखा आघाडीपटू जगात नाही. त्याने मेहनतीच्या बळावर हे स्थान मिळवले आहे.

– लुइस एन्रिक, बार्सिलोना प्रशिक्षक

अथक परिश्रमानंतर पटकावलेले जेतेपद अतीव आनंद आणि समाधान देणारे आहे. या स्पर्धेत सातत्याची कसोटी असते. मात्र आम्ही वर्षभर संघर्ष करत सातत्यपूर्ण कामगिरी जेतेपद पटकावले. दरवर्षी जेतेपद आम्हीच मिळवावे अशी इच्छा आहे.

– आंद्रेस इनेइस्टा, बार्सिलोना कर्णधार