खेळाडूंच्या खरेदी-विक्री व्यवहारासंदर्भात बार्सिलोना क्लबवर घालण्यात आलेली बंदी अपील कालावधीसाठी फिफाने रद्द केली आहे. जगभरातील फुटबॉलचे नियंत्रण करणाऱ्या फिफाने या महिन्यातच अल्पवयीन खेळाडूंची नोंदणी आणि तत्सम नियमांच्या उल्लंघनप्रकरणी बार्सिलोनाच्या खेळाडूंच्या व्यवहारावर १४ महिन्यांकरिता बंदी घातली होती. बार्सिलोनाने या बंदीविरोधात दाद मागितली होती. ही बंदी उठवण्यात यावी, अशी विनंती बार्सिलोनाने केल्याचे फिफाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. बंदीचा निर्णय मागे घेण्यात आल्याने बार्सिलोना संघ व्यवस्थापानाचा नवीन खेळाडू ताफ्यात घेण्याचा मार्ग खुला झाला आहे.
बार्सिलोनाला सध्या कार्यक्षम गोलरक्षक तसेच कालरेस प्युओलसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या जागी सक्षम बदली खेळाडूंची आवश्यकता आहे. बंदी मागे घेण्यात आल्याने बार्सिलोना नव्या खेळाडूंसाठी शोध सुरू करू शकतो. बंदीविरोधात केलेले अपील म्हणजे बंदी मागे घेण्यासाठीची विनंती असल्याचे फिफा अपील समितीचे अध्यक्ष लॅरी म्युसेनडेन यांनी स्पष्ट केले.
‘‘बार्सिलोनावर घालण्यात आलेल्या बंदीसंदर्भातील तपशील, या विषयाची तीव्रता, खेळाडूंच्या नोंदणीसाठीची पुढील तारीख या मुद्दय़ांचा विचार करत बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याव्यतिरिक्त स्वतंत्र क्रीडा लवादाइतके अधिकार फिफा अपील समितीला नसल्याने खेळाडूंच्या पुढील नोंदणी तारखेच्या आधी लवाद याबाबत निर्णय घेणार आहे. लवादाचा निर्णय होईपर्यंत बार्सिलोनाच्या सर्व अधिकारांची जपणूक केली जाईल,’’ असे म्युसेनडेन यांनी पुढे सांगितले.
 २०१० मध्ये फ्रेंच खेळाडू गाइल काकुताच्या करारासंदर्भात चेल्सी संघावर अशाच स्वरूपाची बंदी घालण्यात आली होती. काकुताच्या पूर्वाश्रमीच्या क्लब्जशी करार केल्यानंतर चेल्सीवरील बंदी हटवण्यात आली आहे.