प्रशांत गुप्ता आणि एकलव्य द्विवेदी यांनी रचलेल्या पायावर विजयाचा कळस चढवण्यात उत्तर प्रदेशचे बाकीचे फलंदाज अपयशी ठरले. अखेरच्या षटकात ११ धावांची आवश्यकता असताना उपेंद्र यादवने पाचव्या चेंडूवर लाँग ऑफला षटकार ठोकून आशा निर्माण केली. परंतु शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला आणि फक्त तीन धावांनी उत्तर प्रदेशला निसटता पराभव पत्करावा लागला. बडोद्याने गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या विजेतेपदावर नाव कोरले. इरफान आणि युसूफ पठाण बंधूंच्या अनुपस्थितीत डावखुरा मध्यमगती गोलंदाज ल्यूकमन मेरीवाला (३/३१) बडोद्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
बडोद्याने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १४४ धावा केल्या. केदार देवधर (२६) आणि आदित्य वाघमोडे (४२) यांनी ८० धावांची दमदार सलामी दिल्यानंतर धावा काढण्याच्या प्रयत्नात त्यांचे अनेक फलंदाज बाद झाले. उत्तर प्रदेशकडून गुप्ता (६८) आणि द्विवेदी (५६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचून संघासाठी चांगला पाया उभारला. मात्र दृष्टिपथास असलेल्या विजयावर त्यांना मोहोर उमटवता आली नाही. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात त्यांचे सहा फलंदाज फक्त २५ धावांत बाद झाले.
संक्षिप्त धावफलक
बडोदा : २० षटकांत ७ बाद १४४ (केदार देवधर २६, आदित्य वाघमोडे ४२, हार्दिक पंडय़ा २२; प्रवीण कुमार २/२४, अली मुर्तझा २/२२) विजयी वि. उत्तर प्रदेश : २० षटकांत ७ बाद १४१ (प्रशांत गुप्ता ६८, एकलव्य द्विवेदी ५६; ल्यूकमन मेरीवाला ३/३१)