लहानपणी घरापासून दूर अंतरावर असलेल्या शाळेत धावत जाण्याची सवयच कधी कधी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी उपयुक्त ठरते, हा फ्लाइंग सीख मिल्खासिंग यांच्याबाबत आलेला अनुभव महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर हिच्यादेखील वाटय़ाला आला आणि तिने आशियाई स्पर्धेतील स्टीपलचेसमध्ये कांस्यपदकाला गवसणी घातली.
दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत ललिता हिने गतवेळची विजेती व आपलीच सहकारी सुधासिंग हिला मागे टाकत आशियाई पदकावर आपले नाव कोरले. ललिता ही महाराष्ट्रातील मोही या खेडेगावची रहिवासी. तिचे वडील शिवाजी हे शेतकरी आहेत. ललिता व तिच्या जयश्री आणि नकुषा या दोन्ही बहिणी लहानपणी शाळेत धावत जात असत. शेताकडून शाळेत जाताना पाऊलवाटेवरील काटेरी गवत, कधी कधी चिखल, साचलेले पाणी असे अडथळे त्यांना नेहमीच पार करावे लागत असत; पण हेच अडथळे ललितासाठी यशाचा फॉम्र्युला ठरले.
ललिताचे वडील शिवाजी यांना आपल्या मुलींचा खूप अभिमान आहे. ‘‘ललिताने आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळवीत आमच्या गावाचा नावलौकिक उंचावला आहे. आता तिने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवीत भारताचा तिरंगा फडकवावा, अशी माझी इच्छा आहे. एक वेळ आम्ही आर्थिक अडचणी सोसू; पण तुमच्या खेळाच्या कारकिर्दीत अडचण येता कामा नये, असे मी नेहमी त्यांना सांगत आलो; पण पोरींनी कष्टाचे चीज केले आहे. आशियाई स्पर्धेत ललिता पदक स्वीकारत असताना आम्ही टीव्हीवर त्याचे चित्रीकरण पाहत आनंद घेतला. आमच्या गावातील प्रत्येकाला तिच्या या पदकामुळे खूप आनंद झाला आहे. ऑलिम्पिकमध्येही पदक मिळवीत आमच्या गावाची शान ती वाढवेल अशी मला खात्री आहे.’’
ललिताच्या कांस्यपदकाविषयी जयश्री म्हणाली, ‘‘हे पदक आमच्या कुटुंबासाठी खूप मौल्यवान आहे. माझ्या ताईने आम्हा सर्वासाठी खूप केले आहे. ती सर्वात मोठी बहीण आहे. तिला नोकरी मिळाल्यानंतर अतिशय काटकसर करीत तिने आमचे शिक्षण व खेळाची कारकीर्द यासाठी खूप मदत केली आहे. आपल्या कारकिर्दीकरिता आपल्या आईवडिलांनी शेतात खूप काबाडकष्ट केले आहे याची जाणीव तिला आहे.’’