जेरॉम बोटेंगने ९०व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलमुळे बलाढय़ बायर्न म्युनिक संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील साखळी सामन्यात मँचेस्टर सिटीवर १-० असा विजय मिळवला. बुधवारी रात्री झालेल्या लढतींवर जर्मनीतील संघांनी इंग्लिश प्रीमिअर लीग संघांवर वर्चस्व गाजवले.
जर्मनीच्या बायर्न म्युनिकने सामन्यावर पूर्णपणे हुकुमत गाजवली. पण त्यांना मँचेस्टर सिटीचा गोलरक्षक जो हार्टचा बचाव भेदता आला नाही. थॉमस म्युलर आणि रॉबर्ट लेवानडोव्हस्की यांचे गोल करण्याचे प्रयत्न हुकले. अखेर बोटेंगने ९०व्या मिनिटाला गोलशून्यची कोंडी फोडून बायर्न म्युनिकला विजय मिळवून दिला. चेल्सी आणि शाल्के या संघांमधील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. सेस्क फॅब्रेगसने ११व्या मिनिटाला गोल करून चेल्सीला आघाडी मिळवून दिली होती. पण क्लास जॅन हंटेलारने ६२व्या मिनिटाला बरोबरी साधणारा गोल केला.
अन्य सामन्यांत, यासिन ब्राहिमीच्या हॅट्ट्रिकमुळे पोर्तुगालच्या पोटरे संघाने बेलारूसच्या बाटे फुटबॉल क्लबचा ६-० असा धुव्वा उडवला. ब्राहिमीला (पाचव्या, ३२व्या व ५७व्या मिनिटाला) जॅक्सन मार्टिनेझ (३७व्या मिनिटाला), एड्रियन लोपेझ (६१व्या मिनिटाला) आणि विन्सेन्ट अबाऊबाकर (७६व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल करत चांगली साथ दिली.
इटलीच्या रोमा संघाने सीएसकेए मॉस्को संघावर ५-१ असा दणदणीत विजय मिळवला. रोमाकडून गेर्विन्हो (१०व्या व ३१व्या मिनिटाला), जुआन मॅन्युएल इतुर्बे (सहाव्या मिनिटाला), मायकॉन (२०व्या मिनिटाला), सर्जी इग्नासेव्हिच (स्वयंगोल, ५०व्या मिनिटाला) यांनी गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला.