इंडियन प्रिमिअर लीगचे सीओओ सुंदर रमण यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी मंजूर केला. सुंदर रमण यांनी सोमवारी बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांची नागपूरमध्ये भेट घेऊन आयपीएलच्या सीओओ पदाचा राजीनामा दिला होता. मंगळवारी तो मंजूर करण्यात आला.
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणानंतर सुंदर रमण यांनी सीओओ पदावर राहू नये, अशी शशांक मनोहर यांची इच्छा होती. २०१३ मध्ये घडलेल्या या प्रकारानंतरही सुंदर रमण त्याच पदावर कायम असल्याबद्दलही ते नाराज होते. सुंदर रमण यांची या प्रकरणी सध्या चौकशीही सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सीओओ पदाचा राजीनामा दिला आहे.
स्पॉट फिक्सिंगची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मुदगल समितीच्या अहवालात सुंदर रमण सकृतदर्शनी दोषी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांनी या अहवालानंतर लगेचच राजीनामा द्यायला हवा होता. आयपीएलवर क्रिकेट रसिकांचा पुन्हा विश्वास बसावा, यासाठी सुंदर रमण यांनी पायउतार होणे आवश्यक आहे, असे त्यांनी जुलैमध्येच म्हटले होते.