पाकिस्तान विरूद्ध खेळल्या जाणा-या एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामंडळाच्या निवड समितीतर्फे आज(रविवार) भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघातील खेळाडूंच्या निवडी पूर्वी मास्टर ब्लास्टर सचिनने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांतून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. भारताच्या टी-२० संघात फारसा बदल करण्यात आला नसला तरी, एकदिवसीय सामन्यांसाठीच्या संघात बदल करण्यात आले आहेत. इंग्लंड विरूद्धचा कसोटी मालिकेतील पराभव आणि टी-२० सामन्यातील बरोबरी असे असून सुद्धा महेंद्रसिंग धोनीवरचं संघाच्या नेतृत्वाची मदार सोपवण्यात आली आहे. पाकिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघात बंगालच्या २२ वर्षीय जलदगती गोलंदाज शमी अहमद याचा समावेश करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार आणि फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांना या मालिकेत उत्तम कामगिरी करण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. मात्र, हरभजन सिंग आणि जहीर खानला संघातून वगळण्यात आले आहे.

भारतीय संघ टी-२० सामन्यासाठी-
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, युवराजसिंग, रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अशोक डिंडा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, परविंदर अवाना, पियुष चावला, अंबाती रायडू.

भारतीय संघ एकदिवसीय सामन्यासाठी-
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, युवराजसिंग, रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अशोक डिंडा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, शमी अहमद, अमित मिश्रा.