भारतीय ‘अ’ संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने आज संघाची घोषणा केली आहे. एकदिवसीय सामन्यांचं नेतृत्व हे मनीष पांडे तर ४ दिवसांच्या कसोटी सामन्याचं नेतृत्व हे करुण नायरकडे सोपवण्यात आलेलं आहे. मुंबईच्या दृष्टीकोनातून गेले काही हंगाम चांगली कामगिरी करणारे श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांना संघात स्थान मिळालं आहे.

याव्यतिरीक्त आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून चमकदार कामगिरी करणारा कृणाल पांड्याही यंदा भारतीय अ संघाकडून आपलं पदार्पण करणार आहे. याआधी वन-डे सामन्यांची मालिका ही ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि भारत अशा ३ देशांमध्ये खेळवली जाणार होती. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आपल्या खेळाडूंशी मानधनाच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या वादामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा या स्पर्धेतला सहभाग अनिश्चीत मानला जातोय.

करुण नायरकडे ४ दिवसांच्या कसोटी सामन्यांचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. जुलै महिन्याच्या अखेरीस भारताच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होत आहे, त्याआधी या दौऱ्यात आपली छाप पाडून भारतीय संघात आपली जागा निश्चीत करण्याचा करुण नायरचा प्रयत्न असणार आहे. कसोटी सामन्यांसाठी मोहम्मद सिराज, अनिकेत चौधरी हे जलदगती गोलंदाज तर फिरकीपटूंमध्ये शाहबाज नदीम आणि जयंत यादवची संघात निवड करण्यात आलेली आहे.

एकदिवसीय सामन्यांसाठीचा संघ

मनीष पांडे (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मनदीप सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दिपक हुडा, करुण नायर, कृणाल पांड्या, विजय शंकर, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, जयंत यादव, बसील थम्पी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, सिद्धार्थ कौल

४ दिवसीय कसोटी सामन्यांसाठी संघ

करुण नायर (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), पी.के.पांचाल, अभिनव मुकुंद, श्रेयस अय्यर, अंकीत बावने, सुदीप चॅटर्जी, हनुमा विहारी, जयंत यादव, शाहबाज नदीम, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, अनिकेत चौधरी, अंकित राजपुत

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांची पदार्पणाची संधी थोडक्यात हुकली होती. त्यामुळे भारताच्या आगामी श्रीलंका दौऱ्याआधी मुंबईचे हे दोन्ही खेळाडू आपल्या खेळामधून निवड समितीवर छाप पाडतात का हे पहावं लागणार आहे.