आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मान्यता असलेल्या काही संघटनांच्या मागणीमुळे २० एप्रिलला कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
‘‘मुंबईत २० एप्रिलला बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक होणार आह़े,’’ अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी दुबईहून दिली. आयपीएलच्या सातव्या हंगामातील पहिल्या टप्प्याला बुधवारपासून प्रारंभ झाला.
राजस्थान क्रिकेट असोसिएशनसहित सहा संघटनांनी कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाशी निगडित विषयांवर चर्चा करण्यासाठी येत्या रविवारी ही सभा होणार आहे.
राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे सचिव के. के. शर्मा यांनी बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष शिवलाल यादव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात बीसीसीआयची बाजू मांडणाऱ्या कायदेतज्ज्ञाला कोण सूचना देत आहे, या विषयी आम्ही अनभिज्ञ आहोत. बीसीसीआयच्या बैठकीत यासंदर्भात कधीही चर्चा झाली नाही आणि याबाबत कोणतीही बैठक झाली नाही.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, ‘‘बीसीसीआयची आणि खेळाडूंची प्रतिमा सुधारण्यासाठी कोणती पावले उचलण्यात येणार आहेत, याची आम्हाला आवश्यकता नाही. त्यामुळे २२ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पुन्हा सुनावणीस येईल, त्याअगोदर २० एप्रिलला तातडीची कार्यकारिणी समितीची सभा घ्यावी. जेणेकरून वकीलाला बीसीसीआयकडून सूचना दिल्या जातील. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीकडून दिल्या जाणार नाहीत.’’
राजस्थानप्रमाणेच आणखी काही राज्य संघटनांनीही बीसीसीआयला अशाच प्रकारची पत्रे पाठवली आहेत. बीसीसीआयचे माजी सचिव आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव निरंजन शाह म्हणाले की, ‘‘बीसीसीआयची मान्यता असलेल्या किमान पाच ते सहा संघटनांनी अशा प्रकारची पत्रे दिली आहे.’’ परंतु शाह कार्यकारिणी समितीचे सदस्य नाहीत.

बीसीसीआयच्या संकेतस्थळानुसार
कार्यकारिणी समिती अशी
प्रभारी अध्यक्ष : सुनील गावस्कर
सचिव : संजय पटेल
संयुक्त सचिव : अनुराग ठाकूर
कोषाध्यक्ष : अनिरुद्ध चौधरी
उपाध्यक्ष : एस. पी. बन्सल (उत्तर), शिवलाल यादव (दक्षिण), चित्रक मित्रा (पूर्व), रवी सावंत (पश्चिम), राजीव शुक्ला (मध्य)
कायमस्वरूपी कसोटी केंद्रे : दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन, बंगाल क्रिकेट असोसिएशन, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन.
अस्थायी केंद्रे : हरयाणा क्रिकेट असोसिएशन (उत्तर), गोवा क्रिकेट असोसिएशन (दक्षिण), नॅशनल क्रिकेट असोसिएशन (पूर्व), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (पश्चिम), रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड.
गेल्या दोन वर्षांत कसोटी यजमानपद : कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, पंजाब क्रिकेट असोसिएशन, गुजरात क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन, हैदराबाद क्रिकेट असोसिएशन.