लोढा समितीच्या शिफारसींसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली प्रशासकीय समिती, प्रशिक्षक निवडीचा घोळ आणि समित्यांचं राजकारण यामुळे बीसीसीआयची अवस्था सध्या निर्नायकी झाली आहे. आधी कुंबळेंचा राजीनामा आणि त्यानंतर शास्त्रींची निवड झाल्यानंतर मर्जीतल्या लोकांसाठीचं लॉबिंग यामुळे बीसीसीआय लागोपाठ दोनवेळा तोंडावर पडली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयमध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

मी जबाबदारीपासून पळ काढणारा माणूस नाहीये. जेव्हा कधी भारतीय क्रिकेटला माझी गरज असेल त्यावेळी मी क्रिकेटमध्ये परतायला तयार असल्याचं वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. याआधी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य सौरव गांगुलीने अनुराग ठाकूर यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देत, भारतीय क्रिकेटला तुमची गरज असल्याचं ट्विट केलं होतं. यावर प्रतिक्रीया विचारली असताना ठाकूर म्हणाले, ”सौरवचे मी मनापासून आभार मानतो. मात्र अद्याप मी कोणताही निर्णय घेतला नाहीये. पण भारतीय क्रिकेटला माझी गरज असेल तर मी माझ्या जबाबदारीपासून नक्कीच पळ काढणार नाही.” यावेळी न्यायव्यवस्थेवरही आपला विश्वास असल्याचं अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यात दिरंगाई केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना पदावरुन हटवलं होतं. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात आला होता. मात्र ठाकूर यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावरचा खटला मागे घेतला आहे.

बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनुराग ठाकूर हे हिमाचल ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष बनले आहेत. त्यामुळे सध्या हिमाचल प्रदेशमध्ये ऑलिम्पिक खेळांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा आपला मानस असल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हणलंय. त्यामुळे अनुराग ठाकूर आता परत बीसीसीआयमध्ये परतणार का?, हे पाहणं आगामी काळात म्हत्वाचं ठरणार आहे.