आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बीसीसीआयने जुलै महिन्यात केलेल्या आर्थिक व्यवहारांची यादी आपल्या वेबसाईटवर जाहीर केली आहे. या महिन्यात बीसीसीआयने महिला विश्वचषकात चांगली कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंनाही बक्षिसाची रक्कम दिली आहे.

नेमक्या कोणत्या खेळाडू आणि संघांचं देणं या महिन्यात बीसीसीआयने पूर्ण केलं आहे, यावर एक नजर टाकणार आहोत.

  • महिला विश्वचषकात चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाला आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला बीसीसीआयने प्रत्येकी ४५ लाख रुपयांचं बक्षीस दिलं आहे.
  • कमीत कमी ९ कसोटी सामने खेळणाऱ्या माजी भारतीय क्रिकेटपटूंना बीसीसीआयने ३५ लाखांचं मानधन दिलं आहे. यामध्ये रॉबिन सिंह, योगराज सिंह, टी.ए. शेखर आणि सरणदीप सिंह या खेळाडूंचा समावेश आहे.
  • आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आल्यानंतर मिळालेल्या इनामाच्या रकमेतून बक्षिसाची रक्कम अदा करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्टी म्हणजे गेले काही महिने संघात जागा मिळवू न शकलेल्या स्टुअर्ट बिन्नीलाही बीसीसीआयने ५५ लाखांचं बक्षिस दिलेलं आहे.
  • याव्यतिरीक्त भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार व्हावं लागलेल्या अनिल कुंबळेंचं थकित मानधनही बीसीसीआयने दिलं आहे. मे आणि जून महिन्याचे मिळून अनिल कुंबळे यांना ४८.७५ लाखांचं मानधन बीसीसीआयने दिलेलं आहे.
  • जून महिन्यात बीसीसीआयने तब्बल २० कोटींची रक्कम टीडीएसच्या रुपात भरली आहे. याव्यतिरीक्त बंगळुरु येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या नुतनीकरणासाठी कर्नाटक औद्योगिक विकास महामंडळाला ३८ कोटींची रक्कम दिली आहे.
  • २०१७ साली आयपीएलमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलेल्या रायजिंग पुणे सुपरजाएंट्स संघाला २१ कोटींचं थकित मानधनही बीसीसीआयने पूर्ण केलं आहे. याव्यतिरीक्त संघातील खेळाडूंना राहण्यासाठी सोय केलेली हॉटेल, टिव्ही आणि प्रिंट मीडियामधल्या जाहिरीती यांची देयकही बीसीसीआयने पूर्ण केली आहेत.
  • २०१७ सालच्या आयपीएल स्पर्धेत पहिल्या ४ स्थानावर आलेल्यांपैकी सनरायजर्स हैदराबाद संघाला बीसीसीसआयने १६ कोटींची थकित बक्षिसाची रक्कम दिलेली आहे.
  • आयपीएलसाठी सामनाअधिकारी, पंच आणि हाय डेफीनेशनस कॅमेऱ्यांचं १.६ कोटींचं देयकही बीसीसीआयने पूर्ण केलं आहे.