भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) अध्यक्षपदावरून अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना हटविण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या पदांसाठी नावं सुचविण्यासाठी नियुक्त केलेल्या न्यायमित्रांच्या समितीतून (अमायकस क्युरी) कायदेतज्ज्ञ फली नरिमन यांनी माघार घेतली आहे. फली नरिमन यांच्या जागी अनिल दिवाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोर्टाच्या आदेशांचे पालन न केल्याने सोमवारी झालेल्या सुनावणीत अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून हटविण्यात आले. याशिवाय, ठाकूर यांच्यावरील खोटी साक्ष दिल्याच्या आरोपावरून कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि सचिवपद रिक्त झाल्याने त्याजागी नवे पदाधिकारी निवडण्यासाठी कोर्टाने फली नरिमन आणि गोपाल सुब्रमण्यम यांची नियुक्ती केल्याचेही सुनावणीत म्हटले. मात्र, कोर्टाने निर्णय जाहीर केल्याच्या दुसऱयाच दिवशी फली नरिमन यांनी या वादातून माघार घेतल्याचे ट्विट एएनआयने केले आहे. बीसीसीआय प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी होणार आहे. या सुनावणीत न्यायमित्रांकडून बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि सचिव पदासाठी दोन नवीन नावं कोर्टापुढे सादर केली जाण्याची शक्यता आहे.

वाचा: बीसीसीआयमध्ये आता ‘दादागिरी’, सौरव गांगुलीकडे अध्यक्षपद?

 

दरम्यान, बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याचे नाव आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. तर सचिव पदासाठी झारखंड क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख अमिताभ चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. गांगुलीसोबतच पश्चिम झोनचे उपाध्यक्ष टी.सी.मॅथ्यू आणि गौतम रॉय देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव ब्रिजेश पटेल यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र, बीसीसीआयच्या नियमांनुसार अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीचे नाव योग्य असल्याचे म्हटले जात आहे.

वाचा: निवृत्त न्यायाधीशांकडून भारतीय क्रिकेटचे भले होवो – ठाकूर