देशातील अन्य क्रीडा संघटनांसारखे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) पारदर्शक होण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले.बीसीसीआयला महिती अधिकाराच्या अधिपत्याखाली आणणार का, असे विचारल्यावर सोनोवाल म्हणाले की, ‘‘मी बऱ्याचदा सांगितले आहे आणि आतादेखील तेच सांगतो की, सर्वोच्च न्यायालयानुसार बीसीसीआय ही सार्वजनिक संस्था आहे. त्यामुळे अन्य क्रीडा संघटनांमध्ये जशी पारदर्शकता आहे तशीच बीसीसीआयमध्येही असायला हवी आणि यासाठीच मी आग्रही आहे.’’
भारतीय तिरंदाजपटूंनी केलेल्या चमकदार कामगिरीबाबत सोनोवाल म्हणाले की, ‘‘भारतीय तिरंदाजपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले, ही सर्वासाठीच अभिमानास्पद बाब आहे. आमचे आता आलिम्पिक हे लक्ष्य आहे, त्यामुळे मला आशा आहे की या वेळी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला तिरंदाजीमध्येही पदके मिळतील. क्रीडा मंत्रालय नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपमे उभे राहील.’’