भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून अनुभवी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांना वगळले आहे. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा मात्र ‘अ’ श्रेणीमध्ये समावेश केला आहे.
बीसीसीआयने हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान या अनुभवी खेळाडूंनाही या यादीतून डच्चू दिला आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, उपकर्णधार विराट कोहली, एकदिवसीय क्रिकेटमधील विशेषज्ञ सुरेश रैना आणि रविचंद्रन अश्विन या चौघांनी आपली ‘अ’ श्रेणी टिकवली आहे. तर गतवर्षी या श्रेणीत असलेला पाचवा खेळाडू सचिन तेंडुलकरने क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याच्या जागी भुवनेश्वरने स्थान मिळवले आहे. ‘अ’ श्रेणीतील खेळाडूला वार्षिक एक कोटी रुपये मानधन मिळते.
२०११च्या विश्वविजेत्या संघातील पाच खेळाडूंना आगामी विश्वचषकाच्या संभाव्य संघातून आधीच वगळले आहे. आता वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून त्यांना वगळल्यामुळे त्यांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गतवर्षी गंभीर आणि युवराजचा ‘ब’ श्रेणीत समावेश होता.
इंग्लंडमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या भुवनेश्वरने यंदा सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याचप्रमाणे बीसीसीआयचा वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही त्याने यंदा पटकावला आहे. त्यामुळे त्याचा ‘अ’ श्रेणीतील समावेश अभिप्रेतच होता.
मुरली विजय, रवींद्र जडेजा, शिखर धवन, रोहित शर्मा यांनी आपली ‘ब’ श्रेणी टिकवली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीच्या बळावर अंबाती रायुडूला ‘ब’ श्रेणीत स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि संयमी फलंदाज अजिंक्य रहाणे यांचाही या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूल, बंगालचा फलंदाज मनोज तिवारी, पंकज सिंग, मोहित शर्मा आणि वरुण आरोन यांचा ‘क’ गटात समावेश करण्यात आला आहे.

श्रेणीनिहाय करारबद्ध खेळाडूंची यादी –
*    अ श्रेणी : महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार.
*    ब श्रेणी : प्रग्यान ओझा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, शिखर धवन, उमेश यादव, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, मोहम्मद शमी.
*    क श्रेणी : अमित मिश्रा, वरुण आरोन, वृद्धिमान साहा, स्टुअर्ट बिन्नी, पंकज सिंग, आर. विनय कुमार, मोहित शर्मा, धवल कुलकर्णी, परवेझ रसूल, अक्षर पटेल, मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा, कर्ण शर्मा, संजू सॅमसन, कुलदीप यादव, लोकेश राहुल.