भारताचा कसोटी कर्णधार आणि धावांची मशीन अशी बिरुदावली मिरवणाऱ्या विराट कोहलीची राजीव गांधी खेलरत्न आणि तंत्रशुद्ध फलंदाज अजिंक्य रहाणेची अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शिफारस केली आहे. ही शिफारस या वर्षांसाठी करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी पहिल्यांदा शिफारस केली आहे.
जर कोहलीला खेलरत्न पुरस्कार मिळाला तर तो तिसरा क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
७.५ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप आहे, तर पाच लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे अर्जुन पुरस्काराचे स्वरूप आहे.
सध्याच्या घडीला कोहली हा भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. कोहली हा सध्याच्या घडीला भारताच्या धावांची रनमशीन आहे.
नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात कोहलीने नेत्रदीपक कामगिरी केली होती. या विश्वचषकात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या विजयात कोहलीने सिंहाचा वाटा उचलला होता. या विश्वचषकातील सर्वोत्तम
खेळाडूचा पुरस्कारही कोहलीने पटकावला होता.
अजिंक्यने आतापर्यंत आपल्या शैलीदार फलंदाजीचा उत्तम वस्तुपाठ आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवला आहे. त्याचासारखा तंत्रशुद्ध आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी तो एक आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या दौऱ्यात अजिंक्यने सर्वाधिक झेल टिपण्याचा विश्वविक्रमही रचला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेलरत्न पुरस्कारासाठी कोहलीला स्वॉश चॅम्पियन दीपिका पल्लिकल, गोल्फपटू अनिरबन लाहिरी, आशियन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपद पटकावणारा नेमबाजपटू जितू राय आणि धावपटू टिंटू लुका यांच्याकडून कडवी स्पर्धा असेल.