गैरसमजातून विराट कोहलीने पत्रकाराला केलेली शिवीगाळ प्रकरण हे टाळता आले असते, असे मत बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. मात्र हे प्रकरण न वाढवता विश्वचषकावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे त्यांनी सांगितले.
‘‘कोहलीने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. भारतासाठी आता सुरू असलेला विश्वचषक महत्त्वाचा आहे. या सर्व गोष्टी बाजूला ठेवून खेळावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. हे प्रकरण इथेच थांबणे आवश्यक आहे. मात्र भविष्यात असे प्रकार टाळायला हवेत. मी याप्रसंगासंदर्भात खेळाडूंशी बोललेलो नाही. मात्र संघव्यवस्थापनाने खेळाडूंशी बोलून पुरेशी काळजी घेतली आहे,’’ असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
विराट आणि त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा यांचे प्रेमप्रकरण आणि इंग्लंड दौऱ्यावर तिला घेऊन जाण्याची बीसीसीआयने दिलेली खास परवानगी याविषयी एका राष्ट्रीय वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती. ती बातमी देणारा पत्रकार समजून विराटने सरावानंतर दुसऱ्याच पत्रकाराला उद्देशून शिवीगाळ केली.  थोडय़ा वेळानंतर चूक लक्षात आल्यानंतर कोहलीने आणखी एका पत्रकाराच्या माध्यमातून ‘त्या’ पत्रकाराची माफी मागितली. सातत्याने रागाचा पारा चढणाऱ्या विराट कोहलीचे कृत्य खेळाडू आणि त्याहीपेक्षा माणुसकीला साजेसे नसल्याची चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगली आहे.