आयपीएलवर इंग्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू इयान बोथम यांनी केलेल्या टीकेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चांगलेच फटकारले आहे. सत्य जाणून न घेता बोथम यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे मत बीसीसीआयने व्यक्त केले आहे.
‘‘बोथम यांनी मांडलेली गोष्ट त्यांनी पडताळून पाहायला हवी. आयपीएलसाठी अन्य क्रिकेट मंडळे परवानगी कसे देतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आम्ही १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सहून अधिक रक्कम विदेशी खेळाडूंच्या मंडळांमध्ये देतो, ’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
बुधवारी एमसीसीच्या व्याख्यानामध्ये बोथम म्हणाले की, ‘‘वर्षांतून दोन महिन्यांसाठी आयपीएल विदेशी खेळाडूंना खेळवते, पण त्यांच्या मंडळांना एक छदामही देत नाहीत. या लीगमुळे सट्टेबाजी आणि सामना निश्चितीला वाव मिळत असून क्रिकेटपटू गुलाम होत आहेत. ’’