येत्या हंगामात सर्व रणजी सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. याचप्रमाणे दुलीप करंडक स्पध्रेची विभागीय रचना रद्द करून अखिल भारतीय स्तरावरील चार संघ निवडण्यात येणार आहेत.
भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तांत्रिक समितीने हे निर्णय घेतले आहे.
या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के उपस्थित होते. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘तांत्रिक समितीने २०१६-१७ हंगामासाठी दुलीप करंडक स्पध्रेच्या रचनेत बदल करण्याचे निश्चित केले आहे. राऊंड-रॉबिन पद्धतीने होणाऱ्या सामन्यांसाठी निवड समिती चार संघ निवडणार आहे. या स्पध्रेतील सर्व सामने दिवस-रात्र स्वरूपात होणार आहेत.
येत्या हंगामात भारतीय संघ न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे. यात गुलाबी चेंडूसह प्रकाशझोतातील कसोटी सामना होण्याची दाट शक्यता आहे.
दुलीप करंडक स्पध्रेत परदेशी संघाचा समावेश करण्याचा प्रस्ताव गांगुलीने सादर केला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाला आमंत्रित करण्याविषयी बैठकीत चर्चा झाली. मात्र हा संघ बाद फेरीतील पहिलाच सामना हरल्यास त्यांच्या येण्याला कोणताच अर्थ उरणार नाही, त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला, अशी माहिती सूत्रांनी दिली.