आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महसूल वाढीच्या धोरणात नव्याने बदल केल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व क्रिकेट असोसिएशन्सना आनंद साजरा करण्याचे कारण मिळाले आहे. क्रिकेट खेळाच्या सुधारणेकरिता बीसीसीआयशी संलग्न असलेल्या असोसिएशन्सना १५ कोटी
रुपयांचा अतिरिक्त निधी मिळणार आहे.
आयसीसीने भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांना अधिक महसूल देण्याचे ठरवले आहे. नव्या महसूल धोरणानुसार मिळालेला पैसा संलग्न असोसिएशन्सना देण्याचा निर्णय बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. आयसीसीच्या महसूल वाटप धोरणानुसार भारताला अधिक महसूल मिळणार असल्यामुळे बीसीसीआयच्या प्रत्येक असोसिएशनला १५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. नियमित निधी, टीव्ही प्रसारण हक्क याव्यतिरिक्त हा १५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
‘‘नव्या महसूल धोरणानुसार बीसीसीआयला आयसीसीच्या उत्पन्नापैकी २१ टक्के रक्कम मिळणार आहे. या पैशातूनच क्रिकेट खेळाच्या सुधारणेसाठी आणि तळागाळातील सुविधा वाढवण्यासाठी प्रत्येक असोसिएशनला १५ कोटी रुपये देण्याचे आम्ही ठरवले आहे,’’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ  अधिकाऱ्याने सांगितले.