केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्यास वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामने खेळताना दिसेल. बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट सामन्यांसाठी तयारी दर्शवली असून आता फक्त सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे. पाकिस्तानविरुद्ध दुबईमध्ये क्रिकेट मालिकेसाठी परवानगी देण्यासाठीचे विनंतीपत्र बीसीसीआयने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले आहे. याआधीही शशांक मनोहर अध्यक्ष असताना बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध छोटेखानी मालिकेसाठीची परवानगीची मागणी सरकारकडे केली होती. पण सीमेवरील तणावाची पार्श्वभूमी आणि पाककडून शस्त्रसंधीच्या वारंवार उल्लंघनामुळे केंद्राने नकार कळवला होता.

 

‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आता पुन्हा एकदा सरकारकडे पाकविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी परवानगीची विचारणा केल्याचे समजते आणि यावेळी बीसीसीआयने पाकचे ‘होमग्राऊंड’ असलेल्या दुबईमध्ये हे सामने खेळविण्यासाठीची तयारी दाखवली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात हा दुबई दौऱया नियोजित करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्यानंतर आणि भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱयावर जाण्यापूर्वी या मालिकेचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

”केंद्राकडे आम्ही परवानगीसाठीची विनंती केली आहे. त्यावर सरकार काय भूमिका घेणार हे माहित नाही. मागील वेळी दोन्ही देशांमध्ये सीमेवर खूप तणावपूर्ण परिस्थिती होती. त्याशिवाय या दौऱयासाठी रितसर सर्व नियमांची पूर्तता होण्याचीही गरज आहे. सरकारच्या परवानगीशिवाय बीसीसआय या दौऱयासाठीचा पुढचा कोणताच निर्णय घेऊ शकत नाही.”, असे सुत्रांनी सांगितले.