महेंद्रसिंग धोनीचे नेतृत्व आणि डंकन फ्लेचर यांचे प्रशिक्षकपद खालसा होणार का, हेच दोन महत्त्वाचे प्रश्न मंगळवारी होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर ऐरणीवर आहेत. भारतीय भूमीवर इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाने पत्करलेल्या मानहानीकारक पराभवामुळे या बैठकीत संघाच्या कामगिरीची समीक्षा होऊ शकेल.
‘‘ही नियमित बैठक आहे. परंतु अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी परवानगी दिल्यास फ्लेचर यांचे भवितव्य या बैठकीमध्ये ठरू शकते,’’ असे बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्राकडून समजते.
बीसीसीआयच्या कार्यकारिणीची मागील बैठक गेल्या वर्षी २१ नोव्हेंबरला झाली होती. बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर घातलेली आजीवन बंदी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने उठवली होती. त्यासंदर्भात बीसीसीआयची भूमिका त्या बैठकीत ठरू शकली नव्हती.
‘‘अझरुद्दीनच्या भवितव्याबाबत त्या बैठकीमध्ये निर्णय झाला नव्हता. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढावी की लढू नये, याबाबत कार्यकारिणी समितीमध्ये निर्णय होऊ शकला नाही. कारण कायदेविषयक समिती यासंदर्भात अभ्यास करून या प्रकरणी निष्कर्षांपर्यंत येऊ शकली नव्हती,’’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये ३ फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएलच्या लिलावाचे स्थळ निश्चित होऊ शकेल. परंतु राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील आयपीएल गव्हर्निग कौन्सिल याबाबत निर्णय घेईल, असे अन्य सूत्राने सांगितले. हा लिलाव चेन्नई किंवा कोलकात्यामध्ये होण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे आयपीएलच्या या लिलावामध्ये पाकिस्तानी खेळाडूंचाही समावेश असेल का, हे उत्सुकतेचे ठरणार आहे. मंगळवारी आयपीएलच्या गव्हर्निग कौन्सिलचीही बैठक होणार आहे. याचप्रमाणे अन्य अनेक समित्यांच्या बैठकाही होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.