बीसीसीआयच्या कार्यकारिणीची रविवारी बैठक होत असून, या बैठकीत भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक, अवघ्या ५ लाख रुपयांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाची बदललेली मालकी आणि भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या सल्लागारपदी नीरज कुमार यांची नियुक्ती यावर चर्चा अपेक्षित आहे. नवनियुक्त अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांची पदभार स्वीकारल्यानंतरची पहिलीच बैठक असणार आहे.
परस्परविरोधी हितसंबंधांच्या कात्रीतून सुटण्यासाठी एन. श्रीनिवासन यांनी अवघ्या ५ लाख रुपयांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाची मालकी  चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड या स्वत:च्याच कंपनीला विकली. मात्र या बदलाला आयपीएल प्रशासकीय समितीने मान्यता दिलेली नाही. बीसीसीआयच्या नियमावलीनुसार आयपीएलमधील फ्रँचायजीने संघ विकल्यास विक्री रकमेच्या पाच टक्के हस्तांतर शुल्क देणे अनिवार्य असते. मात्र चेन्नई सुपर किंग्स संघाची मालकी ५ लाखात विकल्याने बीसीसीआयला अवघे २५ हजार रुपये शुल्क मिळणार आहे. श्रीनिवासन गटाची सद्दी मोडून काढण्याच्या उद्देशाने श्रीनिवासन विरोधी गट याप्रश्नी बैठकीत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.  माजी दिल्ली पोलीस आयुक्त नीरज कुमार यांची भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या प्रमुख सल्लागार आणि मधुसुदन शर्मा यांची त्यांचे साहाय्यक पदी नियुक्तीला बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र रवी शास्त्री आणि सौरव गांगुली या पदासाठी शर्यतीत आहेत. साहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर, भरत अरुण आणि आर. श्रीधर यांना कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. भारताच्या बांगलादेश आणि झिम्बाब्वे दौऱ्यांवर शिक्कामोर्तब होण्याची बैठकीत शक्यता आहे.