भारत-पाकिस्तान सीमेवर पाककडून दररोज होणारं शस्त्रसंधींचं उल्लंघन, अतिरेकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद होत असल्यामुळे गेले काही वर्ष भारत-पाकमध्ये कोणत्याही प्रकारे क्रिकेट सामने होत नाहीयेत. मध्यंतरी बीसीसीआय आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डात सामने खेळण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. मात्र राजकीय दबावामुळे बीसीसीआयला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. मात्र भारत-पाकिस्तान सामन्यांसाठी बीसीसीआय अजुनही आग्रही असल्याचं समोर येतंय.

आगामी आशिया चषक भारतात खेळवता यावा यासाठी बीसीसीआयने केंद्र सरकारला पत्र लिहून परवानगी मागितली आहे. याआधी अंडर – १९ आशिया चषकाचं यजमानपद हे भारताकडे येणार होतं, मात्र पाकिस्तानी संघाच्या सहभागावर भारताकडून होणारा विरोध लक्षात घेता ही स्पर्धा मलेशियात हलवण्यात आली. मात्र २०१८ साली जून महिन्यात सिनीअर संघाच्या आशिया चषकाचं यजमानपद हे भारताला गमवायचं नाहीये. त्यात आशिया चषक ही आयसीसीची स्पर्धा असल्यामुळे पाकिस्तानी संघाला भारतात खेळण्याची परवानगी मिळायला हरकत नसल्याचंही, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हणलं आहे.

या स्पर्धेला केंद्र सरकारने परवानगी द्यावी याकरता बीसीसीआय केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करत आहे. जर पाकिस्तान संघाला आशिया चषकात परवानगी नाकारली, तर या स्पर्धेला अर्थच उरणार नाही. आशिया चषकात भारत-पाक सामना हे खऱ्या अर्थाने आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघाला विरोध होता कमा नये, असंही बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने म्हणलं आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने भारतात सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार दिल्यामुळे आशियाई क्रिकेट परिषदेने अंडर – १९ आशिया चषक मलेशियाला हलवला आहे. वास्तविक पाहता ही स्पर्धा बंगळुरुत भरवली जाणार होती.

जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवणार नाही, तोपर्यंत भारत-पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारे क्रिकेटचे सामने होणार नाहीत, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली होती. त्यामुळे बीसीसीआयच्या या मागणीला केंद्र सरकार कसा प्रतिसाद देतंय हे पहावं लागणार आहे.