बंगालविरुद्धची लढत अनिर्णित; शुभम, अभिषेकची चिवट अर्धशतकी खेळी

सर्वाधिक रणजी जेतेपदांचा विक्रम नावावर असणाऱ्या मुंबई संघाने ‘खडूसपणा’ या गुणवैशिष्टय़ाला जागत बंगालविरुद्धचा रणजी करंडक स्पर्धेचा सामना अनिर्णित राखला. बंगालला पहिल्या डावात ९९ धावांत गुंडाळत मुंबईने दमदार सुरुवात केली. २२९ धावांची मजल मारत मुंबईने समाधानकारक आघाडी घेतली. मात्र बंगालने दुसऱ्या डावात चारशेपेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारत मुंबईसमोर ३०८ धावांचे आव्हान ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या आणि अंतिम दिवशी मुंबईची अवस्था ५ बाद ६७ अशी होती. मात्र केवळ दुसरा सामना खेळणारा शुभम रांजणे आणि अनुभवी अभिषेक नायर यांनी चिवटपणे खेळ करत मुंबईला संकटातून बाहेर काढले. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे मुंबईला ३ तर बंगालला एक गुण मिळाला.

चौथ्या आणि अंतिम दिवशी ८ बाद ४३३ वरून पुढे खेळणाऱ्या बंगालचा दुसरा डाव ४३७ धावांतच आटोपला. कर्णधार मनोज तिवारीने १६९ तर सुदीप चॅटर्जीने १३० धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या २७१ धावांच्या भागीदारीने सामन्याचे चित्रच पालटले. मुंबईतर्फे धवल कुलकर्णीने ५ बळी घेतले. बंगालने मुंबईसमोर ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर अपयशी ठरले. स्थानिक क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या अशोक दिंडाने जय बिस्त (१४), कौस्तुभ पवार (६) यांना माघारी धाडले. गुजरातविरुद्ध १९४ धावांची मॅरेथॉन खेळी साकारणारा श्रेयस अय्यर भोपळाही फोडू शकला नाही. दिंडानेच त्याला त्रिफळाचीत केले. सूर्यकुमार यादवने ५२ चेंडूंत २१ तर कर्णधार आदित्य तरेने ४८ चेंडूंत २३ धावा करत पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केले. मुकेश कुमारने सूर्यकुमारला तर प्रग्यान ओझाने आदित्यचा अडथळा दूर केला. ५ बाद ६७ या स्थितीत शुभम रांजणे आणि अभिषेक नायर एकत्र आले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली.

चिवटपणे खेळ करत या दोघांनी दोन सत्रांमध्ये बंगालच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. अर्धशतकानंतर दिंडाने नायरला बाद केले. त्याने १३५ चेंडूंत ८ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली. नायरच्या जागी आलेल्या धवल कुलकर्णीने शुभमला तोलामोलाची साथ दिली. अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा मुंबईच्या ६ बाद २०३ धावा होत्या. शुभमने कणखरपणा सिद्ध करत १९३ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद ७६ धावांची खेळी केली. धवलने ४२ चेंडूंत ६ धावा करत मुंबईचा पराभव टाळण्यात हातभार लावला. बंगालतर्फे दिंडाने ४ बळी घेतले. ७ सामन्यांमध्ये मुंबईचे ३ विजयांसह २९ गुण झाले आहेत.

 

संक्षिप्त धावफलक

  • बंगाल ९९ आणि ४३७ अनिर्णित विरुद्ध मुंबई २२९ आणि ६ बाद २०३ (शुभम रांजणे नाबाद ७६, अभिषेक नायर ५१; अशोक दिंडा ४/७४)

 

भारतीय महिलांचा नेपाळवर दणदणीत विजय

बँकॉक : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई ट्वेन्टी-२० स्पध्रेत दुबळ्या नेपाळचा डाव २१ धावांत गुंडाळून ९९ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. पूनम यादव (३ बळी), सब्बीनेनी मेघना व अनुजा पाटील (२) यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजांना तग धरण्यात अपयश आले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने निर्धारित २० षटकांत ५ बाद १२० धावा केल्या. शिखा पांडेने ३२ चेंडूंत ३९ धावांची खेळी केली. पांडेने कर्णधार हरमनप्रीत कौरसह (१४ नाबाद) सहाव्या विकेट्ससाठी नाबाद ५१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

अंतिम फेरीत आधीच पात्र ठरलेल्या भारतीय संघासाठी हा औपचारिक सामना होता. त्यामुळे मिताली राज आणि झुलन गोस्वामी या अनुभवी खेळाडूंना या लढतीत विश्रांती देण्यात आली होती. विजयासाठी १२१ धावांचा पाठलाग करताना नेपाळचा संपूर्ण संघ १६.३ षटकांत २१ धावांत तंबूत परतला. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यातील ही सर्वात नीचांकी खेळी ठरली.

संक्षिप्त धावफलक

  • भारत : ५ बाद १२० (शिखा पांडे ३९ नाबाद; रुबिना छेत्री २/२१) वि. वि. नेपाळ : सर्व बाद २१ (सरिता मगर ६; पूनम यादव ३/९).