चेन्नई खुली टेनिस स्पर्धा अर्थात भारतात होणाऱ्या एकमेव एटीपी दर्जाच्या स्पर्धेत टॉमस बर्डीच आणि जॅन्को टिप्सारेव्हिच हे जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असणारे खेळाडू सहभागी होणार आहेत.ऑस्ट्रेलियाच्या २६ वर्षीय बर्डीचची ही दुसरी चेन्नईवारी असणार आहे, तर टिप्सारेव्हिच सलग पाचव्यांदा चेन्नईद्वारे आपल्या नव्या हंगामाची सुरुवात करणार आहे.
भारतात बर्डीचचा मोठा चाहतावर्ग आहे. यंदाच्या हंगामात त्याची कामगिरी चांगली झाली आहे. टिप्सारेव्हिचला चेन्नईत खेळणे आवडते. त्याच्या सहभागामुळे टेनिसरसिकांना चांगल्या टेनिसची पर्वणी असेल असे तामिळनाडू टेनिस संघटनेचे अध्यक्ष एम. ए. अलगाप्पन यांनी सांगितले.
बर्डीचने अमेरिकन खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. बर्डीचने डेव्हिस चषकात चेक प्रजासत्ताकचे यशस्वी नेतृत्व केले होते.
बर्डीचने स्टॉकहोम खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. टिप्सारेव्हिचने माद्रिद वर्ल्ड टूर स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचवर मात केली होती. टिप्सारेव्हिचने मोनॅको येथे झालेल्या एटीपी स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता.
३१ डिसेंबरपासून चेन्नई खुल्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.