गोरेगावच्या एमएचबी कॉलनीतील संघर्ष मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम यांच्यात अंतिम मुकाबला रंगणार आहे. महिलांमध्ये डॉ. शिरोडकर आणि शिवशक्ती अंतिम फेरीत आमनेसामने असतील. पुरुष गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एअर इंडियाने युनियन बँकेचा २६-९ असा धुव्वा उडवला. एअर इंडियातर्फे पवन कुमार, प्रशांत चव्हाण, दीपक झझोट यांनी चढाई-पकडीचा उत्कृष्ट खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. भारत पेट्रोलियमने चुरशीच्या लढतीत महिंद्रा एण्ड महिंद्रावर १२-१० असा निसटता विजय मिळवला. महिंद्राने बहुंताशी काळ वर्चस्व राखले परंतु शेवटच्या दहा मिनिटांमध्ये नीलेश शिंदेच्या शानदार चढाईसमोर महिंद्राचे खेळाडू निष्प्रभ ठरले. महिलांमध्ये शिवशक्तीने ५-५ चढायांच्या डावात सुवर्णयुगला १५-१४ (६-५) असे नमवले. शिवशक्तीच्या विजयात सुवर्णा बारटक्के, सोनाली शिंगटे आणि रेखा सावंत चमकल्या. डॉ. शिरोडकरने मध्यंतरातील पिछाडी भरून काढत राजमाता जिजाऊ संघाचा २६-२५ असा मोडून काढला. शेवटच्या ३ मिनिटांत क्षितिजा हिरवेने एकाच चढाईत ४ गडी बाद करत शिरोडकरला आघाडी मिळवून दिली. परंतु शेवटच्या मिनिटाला राजमाता संघाने एका गुणाची आघाडी घेतली. शिरोडकर संघातर्फे सुजाता काळगावकरने शेवटच्या चढाईत २ गडी टिपत संघाला थरारक विजय मिळवून दिला. स्नेहल साळुंखेनेही सुरेख खेळ केला.