ऑस्ट्रेलियामध्ये सध्या ‘बिग बॅश लीग’ची हवा आहे. या स्पर्धेत घडणाऱया विविध घटनांमुळे ‘बिग बॅश लीग’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच या स्पर्धेत सर्वाधिक उंच षटकार ठोकण्याचा विक्रम देखील रचण्यात आला. तर क्षेत्ररक्षणाचे दमदार नमुने देखील पाहायला मिळाले. पण या स्पर्धेतील एका सामन्यात एक धक्कादायक घटना देखील घडली. एडिलेड स्ट्राईकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात झालेल्या सामन्यात हा प्रकार घडला. ब्रॅड हॉज फलंदाजी करताना त्याच्या हातातून बॅट सुटली आणि ती थेट यष्टीरक्षक पीटर नेविल याच्या चेहऱयावर जाऊन आदळली. या घटनेत पीटर नेविल याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. बॅट चेहऱयावर आदळताच पीटर नेविल जागीच खाली कोसळला आणि त्याच्या जबड्याला सुज आली.

सामन्याच्या १८ व्या षटकात हा प्रकार घडला. मेलबर्न संघाच्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्ट्रायकर्स संघाला विजयासाठी १८ चेंडूत ४३ धावांची गरज होती. श्रीलंकेच्या थिसारा परेराच्या पहिल्याच चेंडूवर हॉजने लेग साईडवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण शॉट लगावताना त्याच्या हातातून बॅट सुटली आणि ती थेट यष्टीरक्षक पीटर नेविल याच्या चेहऱयावर आदळली. पीटर नेविलचे लक्ष चेंडूकडे असल्याने त्याच्या नकळत बॅट त्याच्या चेहऱयावर आदळली आणि नेविल याला दुखापतीला सामोरे जावे लागले. नेविलला झालेल्या दुखापतीनंतर त्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. नेविलच्या जबड्याला फ्रेक्चर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

पीटर नेविल याने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना १७ कसोटी आणि ९ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. तर हॉज हा ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट ट्वेन्टी-२० फलंदाज आहे. ट्वेन्टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा ठोकणाऱयांच्या यादीत हॉज दुसऱया स्थानावर आहे. हॉजने २६९ सामन्यांत ७२९९ धावा ठोकल्या आहेत.