राजेश पिल्ले अकादमीने प्रियदर्शनी क्लबचा ६-० असा धुव्वा उडवीत अविनाश भिडे स्मृती नवव्या अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत शानदार प्रारंभ केला. अन्य लढतीत हॉकी लव्हर्स संघाने मेट्रो स्पोर्ट्सला टायब्रेकरद्वारा ५-३ असे पराभूत केले. ही स्पर्धा रक्षक स्पोर्ट्स असोसिएशनने आयोजित केली आहे.
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत हॉकी लव्हर्सला मेट्रोविरुद्ध विजय मिळविण्यासाठी झुंजावे लागले. पूर्ण वेळेत २-२ अशी बरोबरी झाली होती. त्या वेळी हॉकी लव्हर्सकडून दोन्ही गोल करण्याचा मान आदित्य आंबेकर याला मिळाला. त्याने २९ व्या व ३९ व्या मिनिटाला हे गोल केले.
मेट्रो संघाकडून झीशान शेख याने ४१ व्या मिनिटाला तर शैलेश गरसुंद याने ५० व्या मिनिटाला गोल केले. टायब्रेकरमध्ये हॉकी लव्हर्सकडून आकाश गरसुंद, प्रणव गरसुंद व अंकुश पोटरे यांनी गोल केले. मेट्रो संघाकडून शादाब सय्यद याने गोल केला तर समीर शेख, अनिकेत मुथय्या व मुकेश बिरंजे यांनी गोल करण्याची संधी वाया घालविली.
अन्य सामन्यात पिल्ले अकादमीने निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांच्या आनंद गायकवाड (१५ वे व ३९ वे मिनिट) व जितेंद्र कांबळे (२० वे व ३० वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. प्रशांत काळे व आनंद कांबळे यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्यांना चांगली साथ दिली.