केरळमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) एका महिला खेळाडूने केलेल्या आत्महत्येमागे काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र ही आत्महत्या आहे की घातपात हे पोलीस तपासाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे प्राधिकरणाचे सरसंचालक इंजेती श्रीनिवास यांनी सांगितले.
अलपुझा येथील साइ संस्थेच्या जलतरण क्रीडा केंद्रात अपर्णा रामभद्रनने विषारी फळ खाऊन आत्महत्या केली. तसेच तिच्या तीन सहकारी खेळाडूंनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या खेळाडूंना तेथून जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री शिबानंद सोनवल यांच्या आदेशानुसार श्रीनिवास यांनी या घटनेच्या ठिकाणी भेट दिली. नवी दिल्लीत परतल्यानंतर पत्रकार परिषदेत श्रीनिवास यांनी सांगितले की, ‘‘आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या चारही खेळाडूंनी आत्महत्येच्या कारणाबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. मात्र कोणाच्या दबावाखाली त्यांच्याकडून हे निवेदन लिहून घेण्यात आले आहे काय, याची शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे. मी माझ्या भेटीचा अहवाल लवकरच सोनवाल यांच्याकडे देणार असून या अहवालाच्या आधारे ते पुढील कारवाई करणार आहेत. पोलिसांबरोबरच मानवी हक्क आयोगाकडूनही या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘अपर्णाच्या वसतिगृहातील अन्य सहकाऱ्यांशी तसेच तेथील काही कर्मचाऱ्यांशी मी सविस्तर बोललो आहे. मात्र वरिष्ठांकडून लैंगिक शोषण केले जात असल्याच्या मताशी कोणी सहमती दर्शविली नाही. तसेच मी तेथील मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली. नेमके काय घडले हे कोणी सांगू शकले नाही. आत्महत्या करण्यामागची सविस्तर कारणे कोणी सांगू शकले नाही.’’
‘‘या चार खेळाडूंनी दुपारी तीन वाजता हे विषारी फळ खाल्ले असावे असा अंदाज आहे. साधारणपणे सायंकाळी ७.३० वाजता भोजन कक्षात त्या आल्या, मात्र आपल्याला भूक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही मिनिटांनी या खेळाडूंना खूप त्रास सुरू झाला व त्यांना लगेचच रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर तत्परतेने उपचारही सुरू झाले. त्यातच अपर्णाचे निधन झाले. हे फळ केरळमध्ये सर्रास मिळते. दरवर्षी हे फळ खाऊन पाचसहाशे लोक दगावतात, असे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समजले,’’ अशी माहिती श्रीनिवास यांनी दिली.
‘‘अपर्णाच्या कुटुंबीयांना साइतर्फे पाच लाख रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे, तसेच त्यांच्यापैकी एकाला साइ केंद्रात कंत्राटी नोकरी दिली जाईल. अन्य तीन जखमी खेळाडूंवरील उपचाराच्या खर्चाकरिता साइकडून मदत दिली जाणार आहे. या खेळाडूंबरोबर वसतिगृहात राहणाऱ्या अन्य २२ मुलींना खूप मानसिक धक्का बसला आहे. त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदत देण्याचे आदेश मी दिले आहेत. या प्रकरणाबाबत पोलीस व अन्य तपास यंत्रणा यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत मी तेथील आमच्या केंद्रातील सर्व संबंधितांना सूचना दिल्या आहेत,’’ असेही श्रीनिवास यांनी सांगितले.

धक्क्यातून सावरण्यासाठी  ‘साई’चे खेळाडू रजेवर
अलप्पूझा : केरळमधील ‘साई’च्या चार प्रशिक्षणार्थी महिला खेळाडूंनी केलेला आत्महत्येचा प्रयत्न व त्यातील एकीचा झालेला मृत्यू, यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या इतर खेळाडूंना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. यातून सावरण्यासाठी २० पुरुष खेळाडू रजेवर गेले असून १२ महिला खेळाडूंनी रजेसाठी अर्ज केला आहे. साईचे संचालक इंजेती श्रीनिवास यांनी  या वेळी खेळाडूंच्या पालकांनी खेळाडूंना मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी सुटी देणाची मागणी केली आहे. या वेळी श्रीनिवास यांनी धीर देत खेळाडूंनी घाबरून न जाता परिस्थितीशी संघर्ष करावा. रजेवर गेलेल्या खेळाडूंनी पुढील शुक्रवापर्यंत साईमध्ये परतावे, असे आवाहन केले. या केंद्रामध्ये एकूण ५५ खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. घरी जाऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी पालकांसोबत व नोंदणीपुस्तीकेमध्ये नोंद करूनच जावे, असे सांगितले.