गतविजेत्या विश्वनाथन आनंदला बिलबाओ मास्टर बुद्धिबळ स्पध्रेच्या दुसऱ्या डावातही बरोबरीवर समाधान मानावे लागले. चीनच्या लिरेन डिंगविरुद्ध आनंदने बरोबरी राखून संयुक्तपणे दुसरे स्थानही कायम राखले आहे. मात्र, या निकालामुळे आनंदवर जेतेपद कायम राखण्यासाठी दबाव वाढला आहे. उर्वरित चार सामन्यांत त्याला तीनमध्ये काळ्या मोहऱ्यांनी खेळावे लागणार आहे.
‘रुय लोपेझ’ पद्धतीने डावाची सुरुवात करत आनंदने डिंगवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने आनंदच्या सर्व चालींना सडेतोड उत्तर देत कडवी झुंज दिली. या सामन्यात निकाल लागणे अशक्य असल्याचे दोन्ही स्पर्धकांना जाणवल्यामुळे त्यांनी ३४ चालींनंतर सामना बरोबरीवर सोडण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या लढतीत अमेरिकेचा वेस्लेय सो आणि नेदरलँडच्या अनिश गिरी यांच्यातील सामनाही बरोबरीत सुटला. वेस्लेय चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे. आनंद, गिरी दोन गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या आणि डिंग एक गुणासह त्यांच्यापाठोपाठ आहे.