क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च अशा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवून देणारा नेमबाज म्हणजे अभिनव बिंद्रा. रिओ ऑलिम्पिकमध्येही बिंद्राचे सुवर्णपदक अवघ्या काही दशांश गुणांनी हुकले. नेमबाजी खेळाला त्याचे योगदान लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेने खेळाडूंसाठीच्या समितीच्या अध्यक्षपदी बिंद्रा याची निवड केली. चाहते आणि दूरचित्रवाणी यांच्या दृष्टीने खेळात काय बदल करणे आवश्यक आहे याचा आढावा अभिनवच्या नेतृत्वाखालील समितीने घेतला.

यानुसार पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकाराऐवजी मिश्र लढती आयोजित करण्याची सूचना या समितीने केली आहे. याव्यतिरिक्त पुरुषांच्या ५० मीटर प्रोन प्रकाराच्या लढतींचे रूपांतरही मिश्र प्रकारात करण्यात यावे असा प्रस्ताव समितीने मांडला आहे. पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकाराच्या लढतीही एअर पिस्तूलमध्ये मिश्र प्रकारात घेण्यात याव्यात, अशी सूचना समितीने केली आहे. मिश्र स्वरूपामुळे महिला नेमबाजांनी सूचनांचे स्वागत केले आहे. मात्र भारतीय पुरुष नेमबाज चांगली कामगिरी करत असलेल्या ५० मीटर पिस्तूल प्रकार संपूर्णत: बदलण्याच्या सूचनेमुळे पुरुष नेमबाजांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत प्रत्येक खेळात महिलांचे प्रतिनिधित्व ५० टक्के असावे यासाठी प्रत्येक खेळाच्या संघटनेने प्रयत्नशील असावे, असे निर्देश आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिले आहेत. सद्य:स्थितीला ऑलिम्पिक स्पर्धेत नऊ प्रकारांत पुरुषांच्या लढती होतात, तर महिलांसाठी सहा प्रकार आहेत. बिंद्रा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास हे चित्र बदलेल. ‘युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मिश्र प्रकाराची चाचणी घेण्यात आली. १० मीटर एअर सांघिक मिश्र प्रकारात लढती झाल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. नेमबाजी खेळाला भविष्याच्या दृष्टीने काय उपयुक्त ठरू शकेल याची चाचपणी घेण्यात आली,’ असे अभिनवने स्पष्ट केले.

नोव्हेंबर २०१५ मध्ये ५० मी रायफल प्रोन पुरुष, ५० मीटर पिस्तूल पुरुष, डबल ट्रॅप पुरुष प्रकाराच्या लढती मिश्र स्वरूपात रूपांतरित करण्याची शिफारस बिंद्रा समितीने आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेला केली. समितीने या शिफारशींसंदर्भात सध्या या प्रकारामधील खेळाडूंचा सहभाग, युवा खेळाडूंचा सहभाग आणि उपकरणांची उपलब्धता असे मुद्दे लक्षात घेतले. सम्यक अभ्यासानंतर संघटनेच्या अस्थायी समितीने या संदर्भात निर्णय जाहीर केला. पुढील वर्षी राजधानी दिल्लीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या प्रशासकीय आणि कार्यकारिणी समितीच्या बैठकीत शिफारशींसंदर्भात अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.

या बैठकीनंतर दोन दिवसांनंतर दिल्लीतच नेमबाजी विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेत मिश्र सांघिक प्रकारात लढती होणार का याविषयी संदिग्धता आहे. नव्या स्वरूपासाठी नियम अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे विश्वचषकात लढतींचे स्वरूप अद्याप पक्के नाही, असे राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी सांगितले. शारीरिक संपर्क असणाऱ्या कुस्ती, बॉक्सिंग आणि फुटबॉलसारख्या खेळांमध्ये मिश्र प्रकारात लढती आयोजित करण्याची पद्धत रद्द करण्यात आली. मात्र नेमबाजी खेळाचे स्वरूप एकाग्रतेशी संलग्न असल्याने मिश्र प्रकाराचा प्रस्ताव मांडण्यात आला. काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिश्र प्रकारात लढती होत असत. मात्र १९८४ मध्ये पुरुष आणि महिला गट वेगवेगळे करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या मान्यतेनंतर हा बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे सादर होईल.

ऑलिम्पिक समितीने मंजुरी दिल्यास २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५० मी. पिस्तूल, ५० मीटर रायफल प्रोन आणि डबल ट्रॅप प्रकारात फक्त पुरुषांसाठीच्या लढती न होता मिश्र प्रकारात लढती होतील.