भारताविरुद्धची कसोटी मालिका ३-० ने गमावल्यानंतर आता श्रीलंकेचा संघ वन-डे मालिकेसाठी तयार झाला आहे. रविवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला सामना दम्बुल्लाच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र त्याआधी इंग्रजी वृत्तपत्र ‘मिड-डे’ने दिलेल्या बातमीनूसार श्रीलंकेच्या ट्रेनरने आपल्या खेळाडूंना बिस्कीट खाऊ नका असा आदेश दिला आहे. लंकेच्या संघाचे व्यवस्थापक असनका गुरुसिन्हा यांनी ही माहिती दिली आहे.

“संघातील खेळाडूंच्या तंदुरुस्तीची जबाबदारी असलेले आमचे फिजीओ आणि ट्रेनर यांच्याकडे खेळाडूंच्या रोजच्या आहाराची जबाबदारी असते. त्यांच्या सल्ल्यानूसार खेळाडूंना रोजचा नाश्ता आणि जेवण दिलं जातं. त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणेच यापुढे खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये बिस्कीटं खाता येणार नाहीयेत.” काही दिवसांपूर्वी मी खेळाडूंच्या चेंजिंग रुममध्ये बिस्कीटचे पुडे पाहिले, यावेळी मी लगेचच खानपानाची व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचारांना बिस्कीटचे पुडे बाहेर न्यायला सांगितलं. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व श्रीलंकन खेळाडूंना याला आपला पाठींबा दर्शवला असून प्रत्येक जण ट्रेनरने आखून दिलेल्या वेळापत्रकानूसार आपला नाश्ता आणि खाण्याची पथ्य पाळत असल्याचं, गुरुसिन्हा यांनी म्हणलंय.

चॅम्पियन्स करंडकात श्रीलंकेच्या संघाची कामगिरी पाहता, श्रीलंकन सरकार आणि क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना फिटनेसकडे लक्ष देण्याची ताकीद दिली होती. श्रीलंकेचे अनेक खेळाडू त्यांच्या फिटनेसच्या कारणामुळे सध्या संघाबाहेर आहेत, वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हे त्यापैकीच एक नाव आहे. चॅम्पियन्स करंडकापाठोपाठ घरच्या मैदानावर श्रीलंकेच्या दुबळ्या झिम्बाब्वेसमोर पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर अँजलो मॅथ्यूजने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

अवश्य वाचा – श्रीलंकेच्या संघाला पाणी पाजणारी ‘ही’ महिला आहे कोण?

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही काही महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर राहिले होते. त्यानंतर लंकेच्या संघ व्यवस्थापनाने आपल्या खेळाडूंच्या खाण्यात बिस्कीटांना केलेली बंदी पाहता, आगामी काळात आपल्या खेळाडूंचा फिटनेस सुधारण्यावर श्रीलंकेचं संघ व्यवस्थापन जोर देत असल्याचं समोर येतंय.

अवश्य वाचा – …म्हणून युवीला श्रीलंका दौऱ्याला मुकाव लागलं