आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) निवडणूक लढण्यासाठी सध्या तरी एन. श्रीनिवासन अपात्र ठरले आहेत. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या या मंडळावर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्याच्या घडीला बीसीसीआयमधील आठ संघटनांवर भाजपचे वर्चस्व आहे. पुढील महिन्यात बारामतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोन्ही ज्येष्ठ नेते एकत्र येणार असून, या जवळीकीतून बीसीसीआयवर भाजपचा झेंडा फडकू शकतो.
बीसीसीआयअंतर्गत देशभरात ३१ संघटना आहेत. त्यापैक ८ संघटनांवर भाजपचे तर तीन संघटनांवर पवारांचे वर्चस्व आहे. भाजप आणि पवार एकत्र आल्यास त्यांचा १४ संघटनांवर वरचष्मा असेल. उर्वरित १७ संघटनांमधील बऱ्याच संघटना पूर्व आणि दक्षिण विभागातील आहेत. दक्षिण विभागावर श्रीनिवासन यांचे तर पूर्व विभागावर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे वर्चस्व असून त्यांचे श्रीनिवासन यांच्याशी सूत जमले आहे. पण भाजपने जर या १७ पैकी दोन संघटनानांना आपल्या बाजूने वळविले तर बीसीसीआयवर भाजपचा झेंडा फडकू शकतो.
भाजपकडे सध्या गुजरात, दिल्ली, बडोदा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, झारखंड, आंध्र पदेश आणि गोवा या आठ संघटना आहे. गुजरात असोसिएशनचे अध्यक्ष भाजपचे अमित शाह आहेत. दिल्लीचे अध्यक्षपद स्नेह बन्सल यांच्याकडे असून ते अरुण जेटलींचे निकटवर्तीय आहेत. बडोद्याचे समरजितसिंग गायकवाड हे मोदींचे निकटवर्तीय मानले जातात, तर राजस्थानचे अमीन पठाण हे वसुंधरा राजेंचे निकटवर्तीय आहेत. हिमाचल प्रदेशचे अनुराग ठाकूर, झारखंडचे अमिताभ चौधरी आणि आंध्र प्रदेशचे गोकाराजू गंगाराजू हे तिघेही भाजपशी संबंधित आहेत. गोवा संघटनेचा कारभार राज्य क्रीडा प्राधिकरणाकडे असून तिथेही भाजपचेच वर्चस्व आहे.  पवार आणि मोदी यांचे बीसीसीआयच्या सत्तेबाबत सूत जमल्यास भाजपकडे आणखी तीन संघटना वळू शकतील. मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ या तिन्ही संघटनांवर पवार यांचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर रेल्वे, सेना दल आणि भारतीय विद्यापीठ यांनाही बीसीसीआयच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क असून, तेदेखील भाजपच्या पारडय़ामध्ये मत टाकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि पवार गट यांच्याकडे एकूण १४ संघटना होतील.
सध्या शरद पवार बीसीसीआयपासून दूर आहेत. भाजपशी हातमिळवणी करून पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाले तर त्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये (आयसीसी) जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आयसीसीच्या तिजोरीच्या चाव्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांकडे आहेत. पण यामध्येही भारताचे पारडे जड असल्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षाला आयसीसीचे कार्यकारी अध्यक्षपद सहज मिळू शकते. त्यामुळे मोदी-पवार जवळीकीने ‘खेळ’ कारणाची ही नवी चर्चा सुरू झाली आहे.