आयपीएल २०१५ पार पडली. मुंबईने पहिले चार सामने हारुनसुद्धा स्पर्धा जिंकली. इतर संघसुद्धा चांगले होते. पण मुंबईने विजिगीषु वृत्ती दाखवली हे नक्की.
प्रत्येक स्पर्धेनंतर एका नवीन कौशल्याची नजरेत भरण्यासारखी भर क्रिकेटमध्ये पडते, असे दिसून आले आहे. २०१५च्या आयपीएलचा विचार केला तर ज्या कौशल्याने लक्ष वेधून घेतले ते म्हणजे क्षेत्ररक्षकांचे एका हातात अविश्वसनीय झेल घेण्याचे. या आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा वरच्या दर्जाचा होता हे विधान धाडसी व्यक्ती देखील करू शकणार नाही. अगदी हिशोब करायचा झाला, तर सरासरी एका सामन्यात तीन झेल सुटले. त्यातले अनेक झेल तर मध्यरात्रीच्या साखरझोपेतून उठूनसुद्धा कोणीही सहज घेतले असते. विशेष आश्चर्य म्हणजे परदेशी खेळाडूसुद्धा डझनावरी झेल सोडताना दिसले. असे असले तरी जे एकहाती झेल घेतलेले दिसले ते अविश्वसनीय होते. डेविड वॉर्नर, ड्वेन ब्राव्हो, डुप्लेसी, टीम सौदी, लेंडल सिमन्स यांनी घेतलेले एका हातातले झेल हे या आयपीएलचे कुंकुमलेणे म्हणले पाहिजे. फलंदाजाच्या जवळ उभे राहिलेले क्षेत्ररक्षक जेव्हा एका हातात झेल घेतात तेव्हा बऱ्याचदा अनवधानाने किंवा नशिबाने चेंडू हातात येऊन बसतो. उदा. फॉरवर्ड शॉर्टलेगला उभा असलेला खेळाडू फलंदाजाने मारलेला जोरदार फ्लिक नेमक्या वेळेस हात टाकून झेलतो आणि स्वत:च आश्चर्यचकीत होतो. पण डीपमध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक डोक्यावरून गोळीच्या वेगात जाणारा चेंडू नेमक्या वेळेस उंच उडी मारून एका हातात झेलतो, तेव्हा तिथे दिसतो त्याचा फिटनेस, सरावातून आलेला अचूक अंदाज, प्रसंगावधान आणि क्षेत्ररक्षणाविषयी असलेलं प्रेम. त्यातून सीमारेषेला अगदी जवळ झेल घेऊन अडखळत सीमारेषेच्या बाहेर जाण्याअगोदर चेंडू सीमारेषेच्या आत टाकायचा आणि दुस-या खेळाडूने झेलायचा हा प्रकार तर केवळ कल्पेनच्या बाहेरचा. इथून पुढे अशा झेलांचे स्पेशलिस्ट तयार करण्यात संघ वेगळे परिश्रम घेतील. आता फलंदाजाला सीमारेषेवरच्या फील्डरला क्लिअर करणं सुद्धा अवघड जाणार आहे. कारण सीमारेषेवरचा फील्डर मचाणावर बसल्यासारखा भासणार आहे. क्रिकेटची उत्क्रांती अव्याहतपणे चालूच आहे. मानवी मर्यादांच्या व्याख्या सतत बदलणे भाग पडत आहे. लवकरच असे झेल भारतीय खेळाडू घेताना दिसतील, अशी आशा करूया.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)