आपण कुठल्या कामा निमित्त परदेशात सहा महिने राहून परत भारतात येतो.परतल्यावर घरी भेळ पाणीपुरी केलेली असते. आपलं तोंड खवळतं. आपण ताव मारतो. पण पोटाची सवय गेल्याने आपल्याच पदार्थाने पोट बिघडते. गेले पस्तीस दिवस भारतातल्या संथ, हातभर वळणाऱ्या आणि चेंडू खाली रहाणाऱ्या खेळपट्ट्यांची कांगारूंवर अशी भूल चढली होती की धर्मशालातल्या जवळजवळ ब्रिस्बेन चा बाऊन्स असलेल्या खेळपट्टीवर कांगारूंना उत्तेजना आली आणि अतिउत्साहाने तोंडाला पाणी सुटले. स्टिव्ह स्मिथ ज्या प्रमाणे भुवनेशला बाद झाला तो या उत्तेजनेचा सर्वात मोठा नमुना होता. विकेट वरील बाऊन्स बघून त्याने ऑस्ट्रेलियात चालून जातात ते पूल शॉट मारायला सुरुवात केली आणि त्रिफळा बाद झाला.

रेंनशॉ ला पडलेला उमेश यादवचा चेंडू हा वाकाची आठवण करून देणारा होता. स्पिंनर्स नी सुद्धा स्पिन पेक्षा बाऊन्स वर बळी मिळवले. बॅट च्या हँडल ला लागून चेंडू सिली पॉईंटला गेले. चेंडू खाली राहाणाऱ्या खेळपट्ट्याची भारतीय फलंदाजाना सवय आहे. त्यामुळे परदेशात उसळत्या खेळपट्ट्यांवर भारतीय खेळाडूंना त्रास होतो. धर्मशालात भारतीय खेळाडूंनी चांगले जुळवून घेतले आणि ऑस्ट्रेलीयाला बाऊन्स ने सतावले. हे अनपेक्षित होते. उमेश यादव ने दादा स्पेल टाकला.हा स्पेल तो आणि आपण कधीच विसरणार नाही. त्याची ऍकशन अप्रतिम आहे. तो नैसर्गिक खेळाडू आहे. लेग साईडला चेंडू पडू नये म्हणून त्याने त्याच्या मनगटाच्या पोजिशन वर काम केल्याचे जाणवते. जुन्या चेंडूवर रिव्हर्स स्विंग वर तो फलंदाजाचा बूट तोडू शकतो. पूर्ण तंदुरुस्त उमेश आणि शमी हि जोडी परदेशात चांगले विजय मिळवून देऊ शकते. भारतात मालिका जिंकण्याची धर्मशालेच्या विकेटवर ऑस्ट्रेलियाला सुवर्णसंधी होती. पण भारतीय संघाची तयारी उत्तम होती. जडेजा, पुजारा, राहुल, अश्विन, रहाणे सर्वानी वाटा उचलला. कुलदीप यादवच्या रूपात चायनामनचे नवे अस्त्र संघात आले. त्याने घेतलेले बळी डोळ्याचे पारडे फेडणारे होते. विशेषत:मॅक्सवेलला गंडवलेला गुगली पैसा वसूल करून गेला. टॉस हरून ,कोहली नसून,खेळपट्टी अतिजलद असून भारताने सामना जिंकला.
चार पैकी कुठल्याही कसोटीत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले नाही. परंतु मोक्याचे क्षण जिंकले आणि आपण क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर का आहोत दे दाखवून दिले.

– रवि पत्की
Sachoten@hotmail.com