पाकिस्तानने भारतावर अनपेक्षित मात केली. मोठा पराभव झाल्याने चाहत्यांच्या जिव्हारी लागणे साहजिक आहे. सामना संपल्यावर सर्वांनी पाकिस्तानच्या सनसनाटी खेळाला श्रेय दिलं आहे. सर्व समालोचक, कोहली सर्वांनी पाकिस्तानचे कौतुक केले. ते योग्यच आहे. पण पाकिस्तान संघ असा खेळला की आपण निरुत्तर झालो ही पळवाट झाली. सामना पहाताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवत होत्या.

१) फखार झमान याच्या फलंदाजीचा अभ्यास करून त्याला लेग स्टंपवर गोलंदाजी करायची ही रणनिती आखली होती.या गडबडीत नव्या चेंडूवर ऑफ स्टंपवर चांगले चेंडू टाकलेच गेले नाहीत. ज्या नोबॉलवर तो आऊट झाला तो ऑफ स्टंपवर होता. ज्या भुवनेश्वर कुमारने सरळ आणि ऑफ स्टंपवर मारा केला त्याने सर्वात कमी धावा दिल्या.

२) अश्विनने सुद्धा लेग स्टंपवर सतत गोलंदाजी करून आश्चर्यचकित केले. गेल्या पाच वर्षात अश्विनने केलेली  सगळ्यात खराब गोलंदाजी म्हणावी लागेल.

३) कोहली गडबडला: लेग स्टंपचा प्लॅन यशस्वी होत नाही म्हटल्यावर थोडा विराम घेऊन विचार करून प्लॅन बदलणे आवश्यक होते. जाडेजाला ऑफ साईडला धावा जात असताना किती वेळ डीप कव्हर लावला गेला नाही. प्लॅन यशस्वी झाले नाहीत, तर कोहली गडबडतो हे आज दिसून आले. थोडक्यात कोहलीने पाकिस्तानला मोमेंटम बहाल केला. (धोनी आणि गांगुलीने हे होऊ दिले नसते)

४) खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन असताना ५० ओव्हर्स खेळायचे टार्गेट ठेवले असते तर चित्र वेगळे दिसले असते.

५) स्विंग होणाऱ्या चेंडूला डावाच्या सुरवातीला स्विंगच्या विरुद्ध खेळायचे नाही हे कोहली पाळतो. आज मॅच प्रेशर खाली तो ते विसरला. एकूणच कोहलीची आजची देहबोली त्याच्या लौकिकाला साजेशी नव्हती.

६) युवराज सिंग बद्दल नेहमी वाटतं की तो आता बिग मॅच प्लेअर राहिलेला नाही. गेल्या दोन वर्षात जेव्हा त्याच्या धावा झाल्या आहेत तेव्हा परीक्षा पाहणारी गोलंदाजी झालेली नाही. तिथे मनीष पांडे, के.एल.राहुल, रिषभ पंत हे जास्त फिट बसतील. कोहलीने युवराज हट्ट सोडायला हवा.

७) पंडया मात्र स्वतः च्या क्षमतेवर जबरदस्त विश्वास असलेला खेळाडू आहे. आज पंड्याने स्वतः बद्दल मोठा आदर निर्माण केला. पोलार्डसारखा एकापाठोपाठ लिलया षटकार मारणारा खेळाडू आपल्याला मिळाला आहे. लंबी रेसचा घोडा आहे तो. गोलंदाजी करताना सुद्धा त्याची बाऊन्सरवर हुकूमत जाणवली.

८) मोहम्मद अमीरने वसीम अक्रमची आठवण करून देणारा ड्रीम स्पेल टाकला. मजा आ गया.

९) फखार झमानचे उभ्या उभ्या मारलेले फटके बसले. काही त्याने प्रतिभेने मारले. त्याची दहशत वाटावी असा फलंदाज नाही तो. क्रिकेटच्या भाषेत दही खाऊन आला होता तो. (लकी मॅन)

१०) थोडक्यात आजचा पराभव हे पाकिस्तानचा चांगला खेळ, आपल्या संघाची कमी लवचिकता, कोहलीची दबावाखाली थंड पडलेली निर्णय क्षमता, प्रसंगाचे आपल्या संघाने घेतलेले जास्त प्रेशर यांच्या समुच्चयाने झाला.

पाकिस्तान विरुद्ध या पुढे रणनीती बदलावी लागेल. काही खेळाडूंच्या करिअरची एक्सपायरी डेट उलटली आहे. नवे खेळाडू यायला हवेत. भारताचा बेंच गुणी आहे. पुढील काही माहिन्यात नवीन निर्णय घेतले जातील.

– रवि पत्की
sachoten@hotmail.com