भारतीय संघाने २२ वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली. खूप आनंद झाला. मस्तं खेळली मुलं आपली. खरं म्हणजे ही मालिका आपल्या खालच्या फळीच्या (लोअर आर्डर) खेळाडूंना समर्पित केली पाहिजे. धावसंख्येला आदरयुक्त आकार देणं आणि सातत्याने चांगली गोलंदाजी करणे ही दोन कलाटणी देणारी कामे या खालच्या फळीच्या खेळाडूंनी केली. याबद्दल बिन्नी, सहा, ओझा, अश्विन, इशांत, मिश्रा आणि उमेश यादव यांचे कौतुक केले पाहिजे. या खेळाडूंच्या जिगरबाज जुन्या पद्धतीच्या पारंपरिक चिवट कसोटी क्रिकेट खेळामुळे समाधान मिळाले. ट्विंटी-२० चा ओघ इतका खतरनाक आहे की प्रत्येक जण त्या ओघाचा महापूर होउन वहात चाललाय. सहा, बिन्नी, मिश्रा, अश्विन यांनी कसोटी क्रिकेटवर आमचे प्रेम आहे ही भाषा पंडिताना खूश करण्याइतपत मर्यादित न ठेवता कृतित उतरवली. विकेट स्वस्तात द्यायची नाही, फक्त वाइट बॉलचा समाचार घ्यायचा, डेड बॅट डिफेन्सने गोलंदाजाना जेरीस आणायचे याला कसोटी क्रिकेट म्हणतात. हे सूत्र राबवणारी लोअर ऑर्डर तुमच्या संघात असेल तर तुम्ही नाशिबवानच. लोअर ऑर्डरमध्ये गोलंदाज असतात. गोलंदाज आणि सयंम यांचं सख्य म्हणजे मोराचा आकाशातील मुक्त विहारा इतके क्षणभंगूर. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाने सांगितल्याप्रमाणे संघात सहाच मुख्य फलंदाज आहेत याचे भान ठेऊन लोअर ऑर्डरने जी जबाबदारी दाखवली त्यामुळे विनिंग पोजिशनला जाता आले. शास्त्री आणि कोहली यांनी हा नियम घालून दिला आहे. आता याचे काटेकोर पालन व्हायला हवे. गोलंदाजाना फलंदाजीचे तंत्र कमी असते पण त्यांनी कुठल्याही परिस्थितीत स्वस्तात विकेट टाकायची नाही, या सूत्राचे पालन करायचे.
दुसरी खूप समाधान देणारी गोष्ट म्हणजे इशांतचे सीम पोजिशनवर आलेले प्रभुत्व. एखाद्या खेळाडूत ६० कसोटी सामन्यांची गुंतवणूक करून जर त्याचा चेंडू सीमवर पडत नसेल तर काहीतरी चुकत होतं. झालं गेलं जाउ द्या. पण आता इशांत तयार गोलंदाज झाला आहे असं म्हणता येईल. त्याने डावखुरया फलंदाजाना टाकलेली लाइन कमाल होती. अश्विनचे ऑफस्पिनवर पुनर्स्थापित झालेले प्रेम आणि अमित मिश्राच्या लेगस्पिनरची खासियत असलेल्या विकेट्स पाहून स्पीनची बाजू कणखर होते आहे, असे म्हणता येईल. स्टुअर्ट बिन्नी हा त्याच्या वडिलांच्या गोत्रातला (कौटुंबिक आणि गोलंदाजीच्या दृष्टीने) गोलंदाज आहे. अजून ५ किलोमीटरने त्याचा वेग वाढला तर तो सर्व खेळपट्यावर परिणामकारक होईल.
या मालिकेतून काही तांत्रिक इशारे मिळाले आहेत. कोहलीची बॅट ऑफ स्टंपच्या बाहेर अजून स्थिर होत नाही. राहणेचा बचाव परिपूर्ण नाही. के. एल. राहुलला अजून ऑफस्टंपचा अंदाज यायचाय. स्विंगिंग बॉलचा त्याने भरपूर सराव केला पाहिजे.
अजून एक महत्त्वाचा इशारा कोहलीला आहे. पुजारा हा कसोटी करता घडलेला फलंदाज आहे. तो नयनरम्य नसेल पण कायमचा तारणहार होऊ शकतो. त्याला वन डाउन पोजिशन द्यायला हवी. फक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका दौऱयाच्या वेळेस पुजाराची आठवण होऊ नये. तसा पुजारा सरळमार्गी आहे. तो कितीही यशस्वी झाला तरी काही कर्णधारपद मागणार नाही.
– रवि पत्की -sachoten@hotmail.com