बांगलादेश दौरा भारतीय संघाच्या अपयशाने जेवढा गाजला, त्यापेक्षा जास्त संघातील आणि पर्यायाने बीसीसीआयमधील सत्ताकेंद्राच्या संक्रमण अवस्थेमुळे गाजतोय. श्रीनिवासन गोत्यात आल्याने धोनीचे स्थान डळमळीत झाले आहे. श्रीनिवासन यांनी आपल्याला होणारा विरोध कमी करण्यासाठी धोनीला कसोटी कर्णधार पदाची आहुति देण्यासाठी प्रवृत्त केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं म्हणजे आता क्रिकेटचे सर्व अर्थकारण एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० वर अवलंबून आहे. त्यामुळे झटपट सामने ही सोन्याची कोंबडी आहे. धोनीने त्यामुळेच झटपट सामन्यांवर आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण धोनीचे भवितव्य सर्वस्वी श्रीनिवासन यांच्या भवितव्याशी जोडले आहे. सद्यपरिस्थितीत बीसीसीआयचा बॉस नक्की कोण आहे, हे स्पष्ट होत नाहीये. धोनीने बांगलादेश दौऱयात जे नवीन आणि संघाला धक्का देणारे निर्णय घेतले तसेच त्याची बेडरपणे जाहीर वाच्यता केली, त्यावरून असे वाटते की, श्रीनिवासन यांचे अजून नियंत्रण आहे. धोनीने स्वत:चे स्थान बळकट करण्यासाठी टू डाऊन बॅटिंगला यायला सुरवात केली आहे. भारतीय संघाचे २०१५ सालातील उरलेले बहुतेक सर्व एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० सामने भारतात आहेत. (एक झिम्बाब्वेचा किरकोळ दौरासोडून) भारतीय खेळपट्यांवर धोनी बादशाह आहे. त्यामुळे फलंदाजीत टू डाऊन येऊन तो धावांची रास रचू शकतो. ऑस्ट्रेलिया इंग्लंड आफ्रिकेमध्ये तो टू डाऊन आलेला फारसा आठवत नाही. तिथल्या पिचेसवर त्याचे तंत्र उघडे पडते. त्याकरता त्याने अचानक रहाणेचा बळी दिला. वर रहाणे मंद खेळपट्ट्यांवर धावा करत नाही, असेही सांगितले. असे बोलून टू डाऊन पोजिशनला नजीकच्या भारतातल्या सामन्यात त्याला आव्हान मिळणार नाही, याची व्यवस्था केली. (रहाणेचा संयम लवकर संपतो, असे म्हणले असते तर समजण्यासारखे होते)
फील्डवर आणि फील्डच्या बाहेर आक्रमक धोरण दाखवून धोनीने कोहलीच्या स्पर्धेत आपण सुद्धा कमी नाही हे दाखवून द्यायचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे कोहलीचे धोनीच्या दिशेने केलेले धाडसी वक्तव्य, श्रीनी-धोनी भाई भाई या समीकरणाला आव्हान देता येऊ शकते या नव्या समजुतीला बळ देणारे आहे. दालमिया खरंच किती पॉवरफूल आहेत याचा अजून अंदाज लागत नाहीये. रवि शास्त्रीच्या भवितव्याविषयी गांगुली थेट माध्यमांशी बोलतो म्हणजे दालमिया बीसीसीआयवर नियंत्रण ठेवण्याच्या बेतात आहेत असे वाटण्याकरता वाव आहे.
आता आयपीएलचे संघमालकसुद्धा बीसीसीआयची धोरणे ठरवतात हे जगजाहीर आहे. आपल्या आयपीएल संघातील खेळाडू भारतीय संघात असला, तर आपल्या संघाचा भाव आणि जाहिरातीची रेलचेल वाढते, असे गणित त्यामागे आहे. खरंतर भारतीय क्रिकेटचं, संघ निवडीचं नियंत्रण आयपीएल मालकांकडेच आहे, बीसीसीआयकडे नाही, असे समजणे चूक नाही.
धोनी चूक की बरोबर हे ठरवण्याकरता या लेखाचे प्रयोजन नाही. प्रत्येकजण डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे स्पर्धेत टिकून रहाण्याकरता प्रयत्न करतच असतो. भारतीय क्रिकेटमधील ही स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स कशी उलगडते, हे बघणे इंटरेस्टिंग असेल. या सगळ्या कुरघोडीत भारतीय क्रिकेटचे नुकसान होऊ नये, हिच प्रामाणिक अपेक्षा आपण करू शकतो.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)