लॉर्ड्सला भारतानं चांगली कामगिरी केली. बऱ्याच वर्षांनी परदेशात विजय मिळाला. सर्वांच्या छोटय़ामोठय़ा वाटय़ातून सांघिक विजय मिळाला. पहिल्या दिवशी खेळपट्टी पाहिल्यावर वाटलं, की ग्राऊंड्समननं चुकून शेजारच्या बागेत स्टम्प ठोकलेत. ते गवत नव्हतं, भातशेती होती. त्या विकेटवर १५० ते १९० स्कोअर करणं महामुश्कील होतं. विजय, पुजारा, रहाणे, भुवनेश यांनी नेटानं किल्ला लढवला. ऑफ स्टम्पच्या बाहेरचे चेंडू सोडण्याचं चांगलं कौशल्य आणि संयम सर्वानी दाखवला. अँडरसन आणि ब्रॉड अजून बरीच चांगली गोलंदाजी करू शकतात. ऑफ स्टम्पवर टप्पा टाकून किंचित चेंडू बाहेर काढणं खरंतर दोघांना सातत्यानं जमू शकतं. हे चेंडू सोडणं म्हणजे बराचसा नशिबाचा भाग असतो. फलंदाजाला खेळायला भाग पाडणं म्हणजे भेदक गोलंदाजी. डेल स्टेनचा हात त्या बाबतीत कोणी धरू शकत नाही. सातत्यानं वेगात स्टम्पमध्ये बॉल टाकून किंचित बाहेर काढणं आणि फलंदाजाला भाग पाडणं या बाबतीत स्टेन वडील माणूस. दुसरं स्टेनचं वैशिष्टय़ म्हणजे त्याचा कधीच ऑफ डे नसतो. कमाल माणूस आहे तो. अँडरसन स्टेनचा चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकाचा भाऊ ठरेल आणि ब्रॉड आठव्या क्रमांकाचा. त्या हिरव्या विकेटवर २९५ रन्स करणं हे आपल्या फलंदाजांचा संयम आणि परफेक्शनच्या ५० टक्के कमी गोलंदाजी याचं फलित होतं. रहाणेनं दाखवलेला क्लास वरचा होता. एकदिवसीय आणि टी २० मध्ये त्यानं अनेक फटक्यांचा सराव करून करून यशस्वी वापर केला आहे. सरावामुळे हे फटके खेळताना आपण चुकू शकत नाही, हा आत्मविश्वास त्याला आला आहे. त्यामुळे कोणत्याही वेळेस अचानक तो लॉफ्टेड शॉट्स भात्यातून काढू शकतो आणि हे शॉट्स खेळताना तो लक्ष्मणइतका शैलीदार पण वाटतो. सचिनचा डॅश आणि लक्ष्मणाची शैली असं बेमालूम मिश्रण त्याच्यात दिसलं. त्याचं सातत्य कायम राहावं म्हणजे मिळवली. विजय पण बघत राहावा, असा फलंदाज आहे. धावा आणि शैली यांचा कायम पहिलादुसरा क्रम लागला तर आपली मजा आहे. भुवनेश हा मुलगा लहान वयातच जीवनाचं सत्य समजल्यासारखा प्रगल्भ आहे. त्याची विरक्ती बघून नवल वाटतं. मेरठमध्ये हा मुलगा लहानाचा मोठा झाला असेल असं वाटत नाही.
धोनीच्या स्थितप्रज्ञ स्वभावाचा त्यानं बारकाईनं अभ्यास केला असावा. २०२४ सालीसुद्धा भुवनेश उच्च क्रिकेटमध्ये टिकून असल्यास आश्चर्य वाटणार नाही. लंबी रेस का घोडा है वो।
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात इशांत शर्मानं ७ बळी घेतले आणि विजयात मोठा हातभार लावला. इशांतचे स्तुतिपाठक घसरलेल्या पँटी वर करत आणि बाहय़ा सरसावत इशांत चालिसा गायला लागले. ५७ कसोटीत ६ वेळा ५ बळी, २८ डावांत एकही बळी नाही. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्याविरुद्ध ४७च्या सरासरीनं घेतलेल्या विकेट्स. तुमच्या मुख्य गोलंदाजानं दर ४ ते ५ सामन्यांमागे एक सामना जिंकून द्यायला हवा. या माणसाला सीम पोझिशन नाही, स्विंग नाही. पॉन्टिंगला कधीकाळी टाकलेल्या एका स्पेलवर ५७ कसोटी? तिसरीत पहिला नंबर आल्याचं मुलगा लग्नाला आला तरी कौतुक करायचं? ते काही नाही. धोनीला परवडणारे लोक त्याला आजूबाजूला लागतात. निवड समितीत निवडीचे निकष वेगवेगळे आहेत. अ‍ॅरन, पंकज सिंग, धवल कुलकर्णी, ईश्वर पांडे यांचा वशिला निवड समितीत नाही, प्रायोजकांकडे नाही, धोनीकडे नाही. आपल्याकडे असलेल्या स्रोतातच (रिसोर्सेस) मध्ये आपल्याला खेळावं लागतं वगैरे सगळं झूठ आहे. धोनीला ठराविक माणसांपुढे जग नाही. त्याची कप्तानी बळकट राहते. इशांतला मॅन ऑफ द मॅच देणं ही पण व्यूहरचनाच आहे. मॅन ऑफ द मॅचला पण राजकारणाचे रंग असतात. इशांत पुढील कोणती मॅच जिंकून देतो ते बघायला हवं. ती त्याची ११४वी मॅच नसावी. तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल आणि धोनीबद्दल पेशन्स राहणार नाही. असो! विजयाबद्दल संघाचं अभिनंदन!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com