cricket-blog-ravi-patki-670x200क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. ही क्रिकेटविषयी असलेली आणि सिद्ध झालेली समजूत कोहलीच्या खेळाने चुकीची ठरते आहे. सध्या कोहलीचं क्रिकेट म्हणजे फक्त निश्चितता. त्याची फलंदाजी बघत असताना आजकाल असं कधी वाटतच नाही की एखादा चेंडू विराटशी दगाफटका करेल, खेळपट्टी अचानक असा रंग दाखवेल की तो हतबल होईल, एखाद्या गोलंदाजाच्या कौशल्यामुळे त्याला शरण यावं लागेल. थोडक्यात काय तर विराट कधीच ऑऊट होणार नाही, तो अजेय आहे. तुम्ही ऑफिस मध्ये असताना कोहलीचा स्कोअर किती झाला असे विचारायचे. कोहली अजून खेळतोय का असे नाही विचारायचे. कारण तो खेळतच असतो. त्याची फलंदाजी म्हणजे निश्चितता आणि निश्चिंतताही. ‘क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरिअस अनसर्टनटिज’ हे काव्य त्याने त्याच्या क्रिकेटपुरते तरी पुस्तकातून हद्दपार केले आहे. हा स्वप्नवत फॉर्म जितके दिवस चालेल तितके दिवस त्याने धुलाई करायची आणि स्कोअरने नोंद ठेवायची हा सिलसिला चालू राहणार आहे.
परवा मोहालीला केलेला १५४ हा स्कोअर नव्हता. तो अद्वितीय घडणीचा दागिना होता. मला तर आजकाल असं वाटतं की २४ कॅरेटच्या पुढे एक शुद्ध घडणीचं परिमाण असावं आणि त्याला ‘कोहली कॅरेट’ असं नावं द्यावं. ह्यात काहीही अतिशयोक्ती नाही. (काहीही भव्य दिव्य दिसलं की मुंडासं पडेपर्यंत बघत राहयचं आणि तोंड भरून लोकांना सांगत राहयाचं हा आपला सर्वांचा मराठी बाणा)
तर सांगायची गोष्टं अशी की परवाची १५४ ची खेळी बघताना कोहलीची ‘मसल मेमरी’ विकसित झाली आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. सराव करून करून स्नायूंची तल्लख स्मरणशक्ती विकसित करायची. म्हणजे काय तर गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटला की हाताचे आणि पायाचे स्नायू आपोआप स्वयंचलनाने हालचाल करुन नुसते चेंडूला मारत नाहीत तर गॅप्समध्ये चेंडू जाईल असा बॅटला अँगल दिला जातो. ही क्रिया हृदयाच्या स्नायूंप्रमाणे स्वयंचलित (involuntary) होते. म्हणजे स्नायूंमध्ये ही हालचाल सेव्ह केलेली असते. आणि चेंडू पडताच त्यावर आपोआप क्लिक केले जाते. हा आहे सरावाचा महिमा. कोहलीचे सरावाचे सेशन्स विशेष असतात. एका शॉटच्या तो हात धुवून मागे लागतो. त्या करता तो हजारो चेंडू खेळतो. त्याची जिद्द, आहार आणि तंदुरुस्ती विषयी असलेला काटेकोरपणा, स्टॅमिना, अर्धशतक, शतक यावर समाधान न मानण्याची मानसिकता यावरून तो कोणत्यातरी दिव्य ध्येयाने झपाटलेला आहे असे वाटते. अफाट असे माझी भूकं, चतकोराने मला न सुखं अशी त्याची मानसिकता आहे. ही भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने सुदैवाची गोष्टं आहे. (सध्या तो मैदानावर अर्धशतक साजरे करत नाही आणि शतकालादेखील अगदी सौम्य सेलिब्रेशन असते) मोहालीच्या सामन्यानंतर ज्या प्रकारे न्यूझीलंडच्या खेळाडूंनी त्याच्याशी हस्तांदोलन केले त्यात ‘अरे भल्या माणसा कसं जमतं तुला असं खेळायला’? असा एक भारावलेला भाव होता. मोहालीला ट्रेंट बोल्टला मारलेला हुक आणि पुलच्या मधला शॉट आपण कधीही विसरु शकणार नाही. ऑफ साईडला तर तो किल्ली दिलेल्या बाहुल्याप्रमाणे खेळतो. प्रोग्रॅम्ड. यष्टीरक्षक आणि गोलंदाज सोडून उरलेले नऊ क्षेत्ररक्षक ऑफ साईडला लावले तरी तो नक्की गॅप्स काढू शकेल.
आपल्या नशिबाने असा खेळाडू पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभतंय. त्याच्या प्रत्येक डावानंतर त्याच्या एका वेगळ्या गुणाचा साक्षात्कार होतोय आणि नव्याने उद्दीपन मिळतंय. थॅंक यू गॉड फॉर सेंडिंग कोहली!!!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com