इंग्लंड वेस्ट इंडीज कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. इंग्लड कसोटी क्रिकेटमधील चांगला संघ असल्याने आणि वेस्ट इंडीज मागचे शुक्लकाष्ट अनेक वर्षे संपत नसल्याने या कसोटी मालिकेत इंग्लंड सहज विजय मिळवणार, असा सूर होता. पण ज्या पद्धतीने वेस्ट इंडीजने लढाऊ बाणा दाखवत खेळ केला, तो पाहता वेस्ट इंडीज क्रिकेट कडून काही चांगल्या निकालांची अपेक्षा करता येऊ शकते. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट कशी होते, याला फार महत्त्व असते. गोलंदाजाने विकेट काढल्या तर त्याच्या चेंडूंचा दर्जा काय होता, फलंदाजाने शंभर केला तर फास्ट बॉलर्सना कसा खेळला, स्पिनर्सना कसा खेळला, जीवदाने किती मिळाली या सगळ्याला सर्वाधिक महत्त्व असते कारण त्यावरुनच खेळाडू ‘कितने पानी में है’ हे कळते.
वेस्ट इंडीजने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींमध्ये काही दखलपात्र सुधारणा दाखवली. वेस्ट इंडीज क्रिकेटचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे खेळाडूंची बेदरकार ,असंयमी ज्याला फूटलूज म्हणतात अशी स्वैर वृत्ती. वेस्ट इंडीज बेटांची संस्कृती ही ‘यू ओन्ली लिव्ह वन्स ‘अशी मुक्तपणे आयुष्याचा उपभोग घेण्याची आहे. नाच, गाणे, बजावणे, पार्ट्या यात आयुष्य मजेत घालवणे हीच जीवनशैली असते. ही जीवनशैली आणि क्रिकेटला लागणारी शिस्त यांची सांगड घालणे, त्यांना जड जाते. त्यामुळे एकच गोष्ट एकाग्रतेने आणि सातत्याने करत रहाणे त्यांना जमत नाही. म्हणून काही चेंडूवर धावा मिळाल्या नाही की फलंदाज वाईट फटका मारून आऊट होतात तर गोलंदाज देखील लवकर संयम सोडून खराब चेंडू टाकतात. सेलिब्रेशनचा मूळचा पिंड असल्याने कित्येकदा कॅच पकडायच्या आधीच चेंडू उड़वायच्या घाईत कॅचेस सुटतात. लॉईडच्या काळात या स्वैर वृत्तीला लगाम घालणे शक्य झाले होते. त्यामुळे रिचर्ड्ससारखे आपल्या अटींवर आयुष्य जगणारे खेळाडूदेखील संघभावनेने खेळले. अनेक बेटांच्या आणि ध्वजांच्या मनस्वी खेळाडूंना एकसंध ठेऊन जग जिंकणारा लॉईड म्हणून महानच.
या मालिकेत हा सर्वात मोठा बदल दिसला की खेळाडू लढ़ले. प्रत्येक डावात १०० षटकांच्या वर फलंदाजी केली. पहिल्या कसोटीत जेसन होल्डरने किल्ला लढवून अतिशय अवघड परिस्थितीत सामना अनिर्णीत ठेवला. तर शेवटच्या कसोटीत १९४ धावांचा अतिशय चिकाटीने पाठलाग करून सामना जिंकला. इंग्लंडच्या बॉलिंग अॅटकविरूद्ध शेवटच्या डावात १९४ चेस करणे सोपे नाही. ८० धावांत चार गडी बाद झाल्यावर ब्राव्हो आणि ब्लॅकवूड यांनी अनपेक्षितपणे चिवट प्रतिकार करून मॅच जिंकली. हे सगळंच खूप आश्वासक होते. कोच फिल सिमन्सच्या सूचनांमुळे का आणखी कशामुळे पण खेळाडूंचा बदलेला दृष्टिकोन खूप समाधान देणारा आहे.
वास्तविक वेस्ट इंडीजचा टेलर, होल्डर, रोच, गॅब्रियल हा गोलंदाजीचा न्यूक्लिअस चांगला आहे. ब्रेथवेट, ब्रावो, सॅमुएल्स, चंद्रपॉल, ब्लॅकवूड, होल्डर हे चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे रिसोर्सची कमतरता नाही. कमतरता आहे ती चिकाटीची, चिवट झुंजीची. या मालिकेतून दिसलेला वृत्तीबदल सातत्याने दिसला तर वेस्ट इंडीज क्रिकेट नजीकच्या काळात नक्की कात टाकेल. आपण भारतीय देखील आपल्या संघानंतर कुणासाठी सदिच्छा बाळगून असतो तर वेस्ट इंडीजबद्दलच. बरोबर ना?
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)