‘तो पळतो शर्यत जिंकण्यासाठीच’ अशा दंतकथासदृश जमैकाच्या उसेन बोल्टने २०० मीटर शर्यतीतही आपल्या नावाची मोहर उमटवली. बोल्टने सलग चौथ्यांदा या शर्यतीत वर्चस्व गाजवले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये वैयक्तिक धावण्याच्या सर्व प्रकारांत सलग पाचव्यांदा बोल्टने आपला दबदबा राखला.
२९ वर्षीय बोल्टने पाच दिवसांपूर्वीच प्रतिस्पर्धी जस्टिन गॅटलीनला मागे टाकत १०० मी. शर्यतीत अव्वल स्थानी कब्जा केला होता. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि जागतिक विक्रमाधीश बोल्टने २०० मीटर प्रकारातही गॅटलीनला आगेकूच करण्याची संधी न देता १९.५५ सेकंदांत शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. १९.७४ सेकंदांच्या वेळेसह गॅटलीनने दुसरे स्थान मिळवले. दक्षिण आफ्रिकेच्या अनास्को जोबोडवानाने १९.८७ सेकंदांच्या वेळेसह तृतीय स्थान मिळवले.
१०० मी. शर्यतीतील अव्वल स्थानासह बोल्टने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील विक्रमी १०व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. ४०० मीटर रिले चमूचा भाग असलेल्या बोल्टला ११वे सुवर्णपदक नावावर करण्याची संधी आहे. उष्ण आणि आद्र्रतापूर्ण दिवशी बोल्टने दिमाखदार सुरुवात केली. १०० मीटर अंतरातच त्याने आघाडी मिळवली. यानंतर अचंबित करणाऱ्या वेगासह बोल्टने सहकाऱ्यांना सहज मागे टाकले. बोल्टने नोंदवलेली १९.५५ सेकंदांची वेळ यंदाच्या वर्षांतील या प्रकारातील सर्वोत्तम वेळ आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी खराब फॉर्म आणि दुखापतींनी बोल्टला त्रस्त केले होते. त्यातच गॅटलीनने विविध स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करत अव्वल स्थानासाठी दावेदारी सिद्ध केली होती. मात्र अथक सरावावर भर देत बोल्टने मैदानाबाहेरच्या सर्व गोष्टींना बाजूला सारत १०० आणि २०० मीटर शर्यतीत अव्वल स्थानी झेप घेतली.

बोल्टचा अपघातही..
२०० मीटर शर्यत जिंकल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करत असताना उसेन बोल्टचा अपघात झाला. या शर्यतीचे चित्रीकरण करणारा कॅमेरामन आपल्या छायाचित्रण करणाऱ्या गाडीवरून पुढे जात होता. हा कॅमेरामन स्टीलच्या रॉडवर आदळल्याने त्याचे संतुलन सुटले. मग विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या बोल्टवर तो आदळल्यामुळे बोल्टसुद्धा खाली कोसळला. मग कॅमेरामनचा कॅमेरासुद्धा त्याच्याच अंगावर आदळला. या अपघातात बोल्टला कोणतीही इजा झालेली नाही.