‘वेगाच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट’ म्हणून ख्याती असलेल्या उसेन बोल्टने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीमधील सोनेरी यशानंतर रिले शर्यतीत सांघिक सुवर्णपदक प्राप्त करून तिहेरी धमाका साजरा केला. त्याच्या कामगिरीच्या जोरावर जमैकाने ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीचे अजिंक्यपद मिळविले. विजेतेपदाचा दावेदार असलेल्या अमेरिकन संघाला शर्यतीतून बाद व्हावे लागले.
बर्ड्स नेस्ट स्टेडियमवर उत्कंठापूर्ण झालेली ही शर्यत जमैकाने ३७.३६ सेकंदांत पार केली. बोल्टला नेस्टा कार्टर, असाफा पॉवेल व निकेल अ‍ॅशमीड यांची सुरेख साथ लाभली. बोल्टचे जागतिक स्पर्धेच्या कारकीर्दीतील हे ११वे सुवर्णपदक आहे.
ट्रेव्हान ब्रोमेल, जस्टीन गॅटलीन, टायसन गे व माईक रॉजर्स यांचा समावेश असलेल्या अमेरिकन संघाला सुरुवातीला रौप्यपदक जाहीर करण्यात आले होते. मात्र बॅटन देताना त्यांच्या खेळाडूंनी मर्यादेपेक्षा जास्त अंतर ओलांडल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांचा संघ बाद ठरवण्यात आला. चीनने ही शर्यत ३८.०१ सेकंदांत पार करीत दुसरे स्थान मिळवले. कॅनडाने हे अंतर ३८.१३ सेकंदांत पूर्ण करीत कांस्यपदकाची कमाई केली. जमैकाने २००८च्या ऑलिम्पिकपासून जागतिक व ऑलिम्पिक या दोन्ही स्पर्धामध्ये रिले शर्यतीत वर्चस्व राखले आहे.