अव्वल दर्जाचा टेनिसपटू रोहन बोपण्णाने एटीपी मानांकनात पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळवत रिओ ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका निश्चित केली आहे. त्याला पुरुषांच्या दुहेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

बोपण्णाला नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. गतविजेते मार्सेलो मिलो व इव्हान डोडिग यांचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यामुळे बोपण्णाला दुहेरीत दहावे मानांकन मिळाले आहे. लिएण्डर पेसनेही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठत मानांकनात प्रगती केली आहे. त्याला ४६ वे मानांकन मिळाले आहे.

महिलांच्या दुहेरीत सानिया मिर्झाने मार्टिना हिंगिसच्या साथीत जागतिक क्रमवारीत संयुक्तरीत्या अव्वल मानांकन राखले आहे. भारताची प्रार्थना ठोंबरेला २०९ वे मानांकन आहे. एकेरीत अंकिता रैनाला पहिल्या तीनशे क्रमांकांमध्ये स्थान टिकविण्यात अपयश आले आहे. तिची ३०६ व्या क्रमांकांपर्यंत घसरण झाली आहे.

जोडीदाराचे पर्याय

पुरुष दुहेरीत बोपण्णाला ऑलिम्पिकसाठी जोडीदार म्हणून पेसबरोबरच पुरव राजा (१०३), दिविज शरण (११४), साकेत मायनेनी (१२५), जीवन नेदुंचेझियन (१३४) व महेश भूपती (१६४) यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे.