ती इटलीची. तो स्पेनचा. दोघांचीही आवड आणि ध्यास एकच होता- टेनिस. ही ‘सव्‍‌र्हिस’ सुरू असतानाच ‘लव्ह’ गेम कधी बहरला समजलंच नाही. खेळातले त्याचं कर्तृत्व मोठं असल्याने, २५व्या वर्षीच टेनिसला अलविदा म्हणत त्याच्या संसाराचा गाडा रेटू या असा निर्धार तिने केला. पण नियतीच्या मनात हा ‘सेट’ पूर्ण होणं नव्हतंच. तृतीयपानी अशोभनीय प्रकाराला वाहिलेल्या एका दैनिकात तिला त्याच्या दुसऱ्या प्रेमाबद्दल कळलं. बातमी सवंग असली तरी त्यात तथ्य होतं. प्रेमभंग प्रकरणांमध्ये आयुष्यातून त्याला वजा केल्यावर निराशेची पोकळी उरते. तिने चक्क आत्मचरित्र लिहिलं- त्याच्या खोटय़ा चेहऱ्याबद्दल लिहिलं. पुस्तक प्रकाशित झालं आणि मागे राहिलेल्या टेनिसच्या इनिंग्जला बळ मिळालं. मागच्या शनिवारी तिच्या आयुष्याचं वर्तुळरूपी ‘कोर्ट’ पूर्ण झालं. अतरंगी आणि अविश्वसनीय वाटणारी ही कहाणी आहे अमेरिकन खुल्या स्पर्धेत महिला गटाचं जेतेपद पटकावणाऱ्या फ्लॅव्हिआ पेनेट्टाची.

ओरेन्झो आणि कॉनसेट्टा या दाम्पत्याची ही दुसरी मुलगी. पाचव्या वर्षीच टेनिस रॅकेटशी वडिलांनी ओळख करून दिली आणि तेव्हापासून ही रॅकेटच तिचं आयुष्य झालं. मोनिका सेलेसला गुरूस्थानी मानणारी फ्लॅव्हिआ रॅकेट हाती घेतल्यापासून अवघ्या दहा वर्षांत व्यावसायिक टेनिससाठी पात्र ठरली. मर्यादित गुणवत्ता मात्र मेहनत करण्याची तयारी, काटक शरीर आणि स्पर्धाच्या निमित्ताने सतत विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन वागवण्याची क्षमता या गुणांच्या बळावर पेनेट्टाने वाटचाल केली. एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारांत खेळण्याचं कसब तिने आत्मसात केलं. जिंकायला सगळ्यात कठीण अशा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या लाल मातीवर १९९९ साली रॉबर्टा व्हिन्सीसह फ्लॅव्हिआने कनिष्ठ गटाचं जेतेपद पटकावलं. महिला टेनिसला असलेला सातत्याने असातत्यपूर्ण खेळण्याचा शाप फ्लॅव्हिआच्या खेळालाही लागलेला. तिचं कर्तृत्व चमकायचं पण तुकडय़ांमध्ये. २००४ मध्ये पेनेट्टाने पहिल्यांदा डब्ल्यूटीए स्पर्धेचं जेतेपद नावावर केलं. ग्रँड स्लॅम स्पर्धाची किमान वारी करणाऱ्या मंडळींमध्ये फ्लॅव्हिआचं नाव अग्रणी होतं. याच दरम्यान स्पेनच्या कार्लोस मोयाने फ्लॅव्हिआला भुरळ घातली. स्पेनला साजेसा रांगडेपणा आणि स्टाइलबाज वृत्तीने फ्लॅव्हिआला आकर्षून घेतलं. खेळाडूंची प्रेमप्रकरणं चवीनं चघळली जातात. मात्र हे दोघेही दुसऱ्या फळीतले असल्याने दोघांचंही टेनिस सुरू असताना प्रेमप्रकरणानेही वेग घेतला. दोघेही खेळत राहिलो तर संसार होणार नाही हे जाणून फ्लॅव्हिआने ऐन उमेदीत अर्थात पंचविसाव्या वर्षी टेनिस सोडण्याची तयारी केली. तेवढय़ातच कार्लोस दुसऱ्या कुणात तरी गुंतल्याचं फ्लॅव्हिआला तटस्थपणे कळलं. तीन वर्षांत हे एकदाही कळू नये हे फ्लॅव्हिआचं आंधळं प्रेम आणि तीन र्वष दोघींना मी तुमचाच अशी बतावणी करण्याची चतुराई दाखवणारा कार्लोस- खरं कोण दोघांनाच माहिती. पण हा धक्का गहिरा होता. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या फ्लॅव्हिआचं दहा किलो वजन घटलं. आवडतीहून नावडती राणी झालेल्या फ्लॅव्हिआने खेळावर लक्ष केंद्रित केलं. तिला साथ लाभली समदु:खी अर्जेटिनाच्या जिसेला डय़ुलको हिची. स्पेनच्याच फर्नाडो व्हर्डास्कोबरोबरचं प्रेमप्रकरण फिस्कटल्याने जिसेलाला मानसिक आधाराची गरज होती. दोन दु:खी जीव खेळण्यासाठी एकत्र आले आणि त्यांची ऊर्जा सकारात्मक झाली. या जोडीने त्याच वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत महिला दुहेरीच्या जेतेपदावर नाव कोरले. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावलं. थोडय़ाच दिवसांनी मैत्रीपूर्ण लढतीत फ्लॅव्हिआने सेरेना विल्यम्सला नमवण्याची किमया केली. सेरेनाला चीतपट केल्याने आत्मविश्वास उंचावलेल्या फ्लॅव्हिआने नकोशी आठवण (‘स्ट्रेट टू द हार्ट’) या आत्मचरित्राद्वारे मांडली. कार्लोसची बदनामी करायची म्हणून नाही तर खेळाडूही माणूस असतात, तेही चुकू शकतात आणि त्यातून शिकू शकतात हे मांडण्याचा प्रयत्न आहे असं फ्लॅव्हिआने म्हटलंय. मी ज्या कार्लोसवर प्रेम केलं तो वेगळाच होता. त्याच्यासाठी मी माझं घर, मित्रपरिवार, माझा देश सोडला. त्याचं भावविश्व समजून घेतलं. माझं आयुष्य कार्लोसमय होऊ देण्याची मोठी चूक मी केली. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींचं दु:खही सार्वजनिक होतं आणि ते जास्त वेदना देणारं असतं अशी चपराकही फ्लॅव्हिआने लिखाणातून लगावली आहे. वैयक्तिक चिखलफेकीपेक्षा प्रांजळ भूमिका असल्याने चटपटीत बातमीची ओढ असणाऱ्या प्रसारमाध्यमांनी पुस्तकाला अनुल्लेखानं टाळलं. खेळण्याचा, झुंजण्याचा फ्लॅव्हिआचा प्रवास सुरूच होता. ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या दुहेरी प्रकारांत अंतिम चारमध्ये धडक मारणाऱ्या खेळाडूंमध्ये फ्लॅव्हिआचं नाव सातत्याने दिसत होतं. या सुरेख चित्राला गेल्या वर्षी मनगटाच्या दुखापतीने छेद दिला. रॅकेट खेळासाठी मूलभूत मनगटालाच गंभीर दुखापत झाल्याने फ्लॅव्हिआने आता खेळणं थांबवूया असा विचार केला. मात्र लढाई अर्धवट टाकणं तत्त्वात बसत नसल्याने दुखापतीतून सावरल्यावर फ्लॅव्हिआने हा शेवटचा हंगाम म्हणत खेळायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे मागच्या शनिवारी तिचं एकेरीचं ग्रँड स्लॅम जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. योगायोग म्हणजे अंतिम लढतीत तिच्यासमोर होती तिची जीवश्चकंठश्च मैत्रीण रॉबर्टा व्हिन्सी. महत्प्रयासाने सगळं अनुकूल जुळून आलंय, त्याला तडा जाता कामा नये. ईष्र्याविरहित झालेल्या या लढतीत फ्लॅव्हिआ जिंकण्यासाठी ठाम होती. याच स्पर्धेत राफेल नदालला हरवण्याची किमया करणारा इटलीचाच फॅबिओ फॉगनिनी आणि फ्लॅव्हिआ यांच्यात प्रेमांकुर बहरू लागलाय. स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आल्यानंतर फॅबिओ इटलीला परतला. मात्र फ्लॅव्हिआने अंतिम लढतीत धडक मारल्याचे समजताच तो काही तासांत पुन्हा न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला. स्टॅण्डमध्ये उपस्थित फॅबिओच्या साक्षीनेच फ्लॅव्हिआने जेतेपदाचा चषक उंचावला. परक्याला आपलंसं करण्याच्या प्रवासाने फ्लॅव्हिआला बरंच काही शिकवलं आहे. यानिमित्ताने वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांचा एकमेकांवर परिणाम होऊ न देता वाटचाल कशी करावी याचा वस्तुपाठ फ्लॅव्हिआच्या ग्रँड स्लॅम जेतेपदाने दिला आहे.
parag.phatak@expressindia.com