आशियाई क्रीडा स्पध्रेतील विजेता विकास कृष्णन (७५ किलो) आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील माजी सुवर्णपदक विजेत्या मनोज कुमारने (६४ किलो) एआयबीए जागतिक पात्रता बॉक्सिंग स्पध्रेची उपांत्य फेरी गाठून रिओ ऑलिम्पिकमधील आपले स्थान निश्चित केले. ऑलिम्पिकसाठी आता तीन भारतीय बॉक्सिंगपटूंनी स्थान निश्चित केले आहे.

उपांत्यपूर्व फेरीत विकासने कोरियाच्या ली डाँगयुनचा ३-० असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत विकास तुर्कमेनिस्तानच्या अचिलोव्ह अर्सलॅनबेकशी सामना करणार आहे. अचिलोव्हने इटलीच्या कॅव्हालारो सॅल्व्हाटोरला पराभूत केले.

याचप्रमाधे मनोजने उपांत्यपूर्व फेरीत ताजिकिस्तानच्या राखिमोव्ह शावकाटझोनचा ३-० असा पराभव केला. शुक्रवारी उपांत्य फेरीत मनोजची ब्रिटनच्या पॅट मॅक्कोरमॅकशी गाठ पडणार आहे. युरोपियन विजेत्या मॅक्कोरमॅकने फ्रान्सच्या अ‍ॅमझिले हसनला पराभूत केले.

‘‘बॉक्सिंगची वस्तुस्थिती गंभीर असताना मला ऑलिम्पिकमधील संधीने दिलासा दिला आहे. या स्पध्रेतसुद्धा भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंवर कमालीचे दडपण आहे. मात्र ऑलिम्पिकचे दार खुले झाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे,’’ असे मनोजने सांगितले.

माजी आशियाई कांस्यपदक विजेता मनोज आणि विकास दोघेही २०१२च्या लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. मनोजचे उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात आले होते, तर विकासला प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. याआधी मार्च महिन्यात चीनला झालेल्या आशियाई पात्रता स्पध्रेद्वारे शिवा थापाने (५६ किलो) ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.