भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे स्थापना करण्यात आलेल्या बॉक्सिंगविषयक हंगामी समितीने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड चाचण्यांच्या तारखा निश्चित केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निर्णयाचा भारतीय बॉक्सिंगपटूंना फटका बसू नये, यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे हंगामी समितीची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ प्रशासक तारलोचन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय समितीची दिल्लीत बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या झेंडय़ाखाली प्रतिनिधित्त्व करणाऱ्या भारतीय बॉक्सिंगपटूंच्या समस्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
‘‘राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला गटातील संभाव्य बॉक्सिंगपटूंची निवड करण्यासाठी आम्ही तारखा निश्चित केल्या आहेत. या निवड चाचणीसाठी ७ ते ११ मे या कालावधीत पटियाळा येथे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे,’’ असे हंगामी समितीचे समन्वयक राकेश गुप्ता यांनी सांगितले.
२०१२मधील राष्ट्रीय विजेते आणि सध्या पतियाळा येथे सराव शिबिराच्या सदस्यांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटू या चाचणीकरता पात्र असतील. निवड चाचणीद्वारे अंतिम संघ निवडण्यासाठी चाचण्आ २० ते २३ मे या कालावधीत होतील असे त्यांनी पुढे सांगितले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जुलै महिन्यात ग्लासगो, स्कॉटलंड येथे होणार आहे. सप्टेंबरमध्ये इन्चॉन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ९ ते ११ ऑगस्ट या कालावधीत निवड चाचणी होणार आहे.
राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय बॉक्सिंगपटूंना परेदशातील वातावरणाचा सराव व्हावा यासाठी भारतीय बॉक्सिंगपटूंना अन्य देशांचा दौरा करण्याची संधी मिळावी, अशी विनंती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेला करणार असल्याचे हंगामी समितीने स्पष्ट केले.