क्रीडाक्षेत्रातील वाढत्या राजकीय प्रभावाचा जबर फटका भारताला बसू लागला आहे. निवडणुकीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) आचारसंहितेचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननंतर आता आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेवरही तात्पुरत्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीत गैरप्रकार घडल्याच्या शक्यतेवरून आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने भारतीय बॉक्सिंग महासंघाला तात्पुरते निलंबित केले आहे. क्रीडा मंत्रालयानेही बॉक्सिंग संघटनेपाठोपाठ भारतीय तिरंदाजी असोसिएशनची मान्यता रद्द केली आहे.  
‘‘आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने आयएबीएफवर तात्पुरती बंदी घालण्याचे ठरवले आहे. आयएबीएफच्या अलीकडे झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार घडल्याच्या शक्यतेवरून आम्ही हे पाऊल उचलले आहे. या निवडणुकीची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. आयओएचा अध्यक्ष आणि आयएबीएफची निवडणूक याचा परस्परसंबंध असल्याची शक्यता आहे,’’ असे एआयबीएच्या पत्रकात म्हटले आहे. आयएबीएफचे प्रतिनिधी म्हणून अभयसिंग चौटाला यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक लढवली आणि अध्यक्षपदी निवडून आले. विशेष म्हणजे, चौटाला यांचे साडू आणि राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिषेक मटोरिया हे आयएबीएफच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
या कारवाईनंतर क्रीडा मंत्रालयानेही आयएबीएफची मान्यता रद्द करून १५ दिवसांच्या आत फेरनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘‘आयएबीएफची निवडणूक प्रक्रिया चुकीची असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी ठेवण्यात आला होता. उमेदवारी अर्ज कमी आल्यामुळे आयएबीएफच्या कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीतच नव्या कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे फेरनिवडणूक घेण्यासाठी आम्ही त्यांना १५ दिवसांचा कालावधी दिला आहे,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले.
‘‘निवडणुकीची जाहिरात न करणे.. कार्यकारिणी समितीतील सदस्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात झालेली दिरंगाई.. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिळालेला कमी कालावधी.. संकेतस्थळावर योग्य माहिती न देणे.. अशा अनेक त्रुटी निवडणुकी प्रक्रियेदरम्यान जाणवल्या,’’ असेही जितेंद्र सिंग यांनी सांगितले. मात्र आपण फेरनिवडणुकीसाठी आणि अध्यक्षपदाचा त्याग करण्यासाठी तयार आहोत, असे चौटाला यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, ‘‘आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना आपला निरीक्षक पाठवणार आहे. आयएबीएफचे अध्यक्ष आणि महासचिव यांच्याशी मी बोललो असून हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांना एआयबीएच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सांगितले आहे.’’
आयएबीएफचे प्रतिनिधी म्हणून आयओएच्या अध्यक्षपदी चौटाला निवडून आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण मी हरयाणा ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे आयओएमधील माझ्या स्थानावर कोणताही परिणाम होणार नाही, असे चौटाला यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही निवडणूक प्रक्रियेविषयीची सविस्तर माहिती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेला सांगण्यास तयार आहोत, असे मटोरिया यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे मी सांगू शकतो. बिनविरोध आणि एकमताने कार्यकारिणी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरूपाची ही बंदी लवकरात लवकर उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचा खेळाडूंवर कोणताही परिणाम होणार नाही. एआयबीएची ज्युनियर जागतिक स्पर्धा पुढील वर्षी ऑगस्टमध्ये होणार आहे. त्याआधीच आम्ही ही बंदी उठवू, असा विश्वास आहे.’’
भारताला बॉक्सिंगमध्ये पहिले पदक मिळवून देणारा बॉक्सर विजेंदर सिंग म्हणाला, ‘‘भारतीय बॉक्सिंगसाठी हा वाईट दिवस आहे. ही घटना घडेल, असे मला कधीही वाटले नव्हते. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेला निवडणुकीसंदर्भातली माहिती का सांगण्यात आली नाही, हेच मला कळत नाही. मात्र हे प्रकरण लवकरच मिटेल, अशी खात्री आहे.’’
‘‘भारतीय तिरंदाजी असोसिएशनची निवडणूक ९ नोव्हेंबरला पार पडली. पण या निवडणुकीत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले. विजय कुमार मल्होत्रा हे तीनपेक्षा जास्त वेळा अध्यक्षपदी निवडून आले असून ते सध्या ७० वर्षांचे आहेत. क्रीडा मार्गदर्शक तत्त्वानुसार निवडणूक न झाल्यास, कोणत्याही संघटनेला मान्यता देऊ नये, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळेच आम्ही तिरंदाजी असोसिएशनची मान्यता रद्द केली,’’ असे क्रीडामंत्र्यांनी सांगितले. भाजपचे नेते विजय कुमार हे सलग दहाव्यांदा अध्यक्षपदी निवडून आले असून ते ४०पेक्षा जास्त वर्षे भारतीय तिरंदाजी असोसिएशनवर आहेत.     

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन बरखास्त केल्याच्या तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा भारतीय क्रीडाक्षेत्रावर शरमेची नामुष्की ओढवली आहे. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या शक्यतेवरून आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघावर तात्पुरती बंदी घातली. त्यामुळे केंद्र सरकारने क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय बॉक्सिंग महासंघ आणि भारतीय तिरंदाजी असोसिएशनची मान्यता रद्द केली आहे.

बॉक्सिंग सराव शिबिरांचे भवितव्य अधांतरी
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने भारतीय बॉक्सिंग महासंघावर तात्पुरती निलंबनाची कारवाई केल्यामुळे भारतीय बॉक्सिंग संघाच्या सराव शिबिरांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. सध्या देशातल्या विविध भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रांमध्ये वरिष्ठ, कनिष्ठ आणि सबज्युनियर संघांची पाच सराव शिबिरे सुरू आहेत. बंदीच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामधील भारतीय खेळाडूंच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. क्रीडा मंत्रालयानेही भारतीय महासंघाची मान्यता रद्द केली असली तरी त्यांनी सराव शिबिरांबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे ‘साई’ने शिबिरे चालू ठेवण्याचा निर्णय घेत बॉक्सर्सना दिलासा दिला आहे.