बीजिंग ऑलिम्पिकआधी भारतीय बॉक्सिंगला कुणीही गांभीर्याने घेत नव्हते. पण विजेंदर सिंगने बॉक्सिंगमध्ये पहिलेवहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली प्रगती थक्क करणारी आहे. २०१०च्या गुवांगझाऊ आशियाई स्पर्धेत भारताने अ‍ॅथलेटिक्सपाठोपाठ सर्वाधिक पदके मिळवली ती बॉक्सिंगमध्ये. १०पैकी सात वजनी गटात भारतीय बॉक्सर्सनी आपली छाप पाडत दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली होती. त्यामुळे आशियाई स्पर्धेत बॉक्सिंग हा खेळ भारतासाठी पदकांची लयलूट करणारा ठरणार आहे.
भारतीय बॉक्सिंग असोसिएशनवर जवळपास दोन वर्षे ऑलिम्पिक असोसिएशनची बंदी असल्यामुळे बॉक्सर्सना फक्त राष्ट्रकुलसारख्या एकमेव प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होता आले. आता बॉक्सिंग इंडिया या नव्या संघटनेला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने तात्पुरती मान्यता दिल्यामुळे भारतीय बॉक्सर्सना देशाच्या तिरंग्याखाली लढण्याची संधी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सना पाच पदकांवरच समाधान मानावे लागले होते. पण आता ती कसर भरून काढण्यासाठी भारतीय बॉक्सिंगपटू उत्सुक आहेत.
विजेंदर सिंगची उणीव भासणार
गेल्या वेळी सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या विजेंदर सिंगची उणीव भारताला जाणवणार आहे. त्याची जागा विकास कृष्णनने घेतली असली तरी तो दोन वर्षांनंतर रिंगमध्ये अवतरणार आहे. त्यामुळे गेल्या वेळी सुवर्णपदक पटकावणारा विकास भारताला पदक मिळवून देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चार वर्षांपूर्वी दुखापतीमुळे अखिल कुमारची कारकीर्द संपुष्टात आली, असे वाटू लागले होते. पण विकास मलिक आणि रोहित टोकस या खेळाडूंवर मात करून अखिल कुमारने आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. देवेंद्र सिंग आणि मनदीप जांगरा यांच्याकडून भारताला पदकांच्या अपेक्षा आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या निवड चाचणीत पिंकी जांगराकडून पराभूत झाल्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेला मुकलेली पाच वेळची विश्वविजेती एम. सी. मेरी कोम हिने आशियाई स्पर्धेसाठी दिमाखात स्थान मिळवले आहे. गुवांगझाऊ स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या मेरी कोमने या वेळी मात्र सुवर्णपदकाचे लक्ष बाळगले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सरिता देवीनेही या वेळी सुवर्णपदक मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
ह७९ भारतीय पथकात ६७९ जणांचा समावेश असून यापैकी ५१६ खेळाडू आणि १६३ पदाधिकारी, प्रशिक्षक आणि सहयोगी यांचा समावेश आहे. भारताने आधी ९४२ जणांचे पथक निश्चित केले होते.
ह५ २०१०मध्ये गुवांगझाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने १४ सुवर्ण, १७ रौप्य आणि ३४ कांस्य अशा एकंदर ६५ पदकांची कमाई केली होती. त्या वेळी पदकतालिकेत भारताला सहावा क्रमांक मिळाला होता.
र८ भारतीय खेळाडू तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅनॉइंग, सायकलिंग, इक्वेस्टेरिअन, हॉकी, फुटबॉल, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हॅण्डबॉल, ज्युदो, कबड्डी, रोइंग, सेलिंग, सेपॉक टेकरॉ, नेमबाजी, स्क्वॉश, जलतरण, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू या २८ खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.
सरदारा सिंग भारताचा ध्वजवाहक
इंच्यॉन : भारतीय पुरुष संघाचा कर्णधार सरदारा सिंग याच्याकडे आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या ध्वजवाहकाचा बहुमान सोपवण्यात आला आहे. ‘‘अनेकांनी माझ्याकडे ध्वजवाहक कोण असेल, याविषयी चौकशी केली होती. पण मी प्रशिक्षकांशी संपर्क साधून कोण उपलब्ध होईल, याविषयी विचारणा केली. अनेक खेळाडूंचे उद्घाटनाच्या पुढील दिवशी सामने होणार आहेत. पण सरदाराचा सामना नसल्यामुळे त्याची ध्वजवाहक म्हणून निवड करण्याचा निर्णय आम्ही घेतला,’’ असे भारतीय पथकाचे प्रमुख आदील सुमारीवाला यांनी सांगितले.